धरमशाला कसोटी जिंकून टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका विजयाची गुढी उभारली. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत धावांचे इमले रचले गेले, शतके झाली, बळींची रास पाहिली. विशेष म्हणजे, खेळाडूंमध्ये झालेली बाचाबाची आणि स्लेजिंगमुळे ही मालिका चर्चेचा विषय ठरली. पण अखेरीस भारतीय संघाने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सने मात करून कसोटी क्रमवारीतील आपले नंबर एकचे स्थान कायम ठेवले. बॉर्डर-गावस्कर मालिका टीम इंडियाने २-१ अशी जिंकली.

धरमशाला कसोटी जिंकण्यासाठी केवळ १०६ धावांचे आव्हान होते. तिसऱया दिवसाच्या अखेरीस भारताने बिनबाद १९ धावा देखील केल्या होत्या. त्यामुळे आज विजयासाठी केवळ ८७ धावांची गरज असताना मुरली विजय(८) बाद झाला. तर चेतेश्वर पुजारा शून्यावर धावचीत झाला. पण कर्णधार अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना कोणतीही संधी न देता अगदी पहिल्या चेंडूपासूनच तडाखेबाज फटकेबाजीला सुरूवात केली. तर दुसऱया बाजूला केएल राहुलने आपली संयमी खेळी सुरू ठेवली. दोघांनी तिसऱया विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विजयासाठी तीन धावांची गरज असताना रहाणेने केअल राहुलला स्ट्राईक दिली. राहुलने तीन धावा वसुल करून आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संपूर्ण स्टेडियमवर विजयाचे सेलिब्रेशन सुरू झाले. रहाणेने यावेळी २६ चेंडूत नाबाद ३७ धावा ठोकल्या. यात दोन षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे.

कसोटीच्या तिसऱया दिवसाशी पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताचा पहिला डाव ३३२ धावांवर आटोपला होता. भारताला ३२ धावांची किरकोळ आघाडी घेता आली. पण प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी दुसऱया डाव्यात ऑस्ट्रेलियाला सुरूवातीलाच तीन मोठे धक्के दिले. उमेश यादवने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर डेव्हिड वॉर्नर(६) आणि रेनशॉ(८) यांना चालते केले. तर दमदार फॉर्मात असलेल्या स्टीव्ह स्मिथचा(१७) काटा भुवनेश्वर कुमारने दूर केला. भुवनेश्वरने स्मिथला त्रिफळाचीत केले. दुसऱया सत्रात देखील भारतीय गोलंदाजांचा वरचष्मा राहिला.

 

अश्विनच्या गोलंदाजीवर पीटर हँड्सकोम्बच्या बॅटला कडा घेऊन गेलेला चेंडू अजिंक्य रहाणेने स्लिपमध्ये अफलातून टीपला आणि भारताला चौथे यश मिळाले. पुढच्याच षटकात जडेजाने शॉन मार्शला चालते केले. ९२ धावांवरच ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत दाखल झाले होते. मग मॅक्सवेलने डाव सारवण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यालाही अश्विनने ४५ धावांवर पायचीत केले. जडेजाने आणखी एक धक्का देत कमिन्सला झेलबाद केले. त्यानंतर जडेजाने ओकिफला, तर उमेश यादवने नॅथन लियॉनला शून्यावर माघारी धाडले. अश्विनने शेवटची विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाचा डाव १३७ धावांत गुंडाळला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी केवळ १०६ धावांची कमकुवत आव्हान होते.