भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या कुलदीप यादवच्या फिरकीने ऑस्ट्रेलियन संघाला ३०० धावांवर रोखले आहे. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ३०० धावांवर माघारी परतला असून दिवसअखेर भारतीय संघ फक्त एका षटकापुरता फलंदाजीसाठी मैदानात उतरला. भारताने पहिल्या षटकात एकही धावा केल्या नसून लोकेश राहुल आणि मुरली विजय ही जोडी मैदानात आहे.

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला शनिवारी सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी बघून भारतीय संघात पाच गोलंदाजांचा समावेश करण्यात आला. कर्णधार अजिंक्य रहाणेचा विश्वास गोलंदाजांनीही सार्थ ठरवला. उमेश यादवने सलामीची जोडी फोडली. सलामीवीर मॅट रॅनशो स्वस्तात माघारी परतला. यादवने त्याला त्रिफळाचीत केले. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने डेव्हिड वॉर्नरच्या साथीने संघाला सावरले. या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला सुस्थितीत नेले. ही जोडी भारतीय गोलंदाजांवर डोईजड ठरेल असे दिसत असतानाच कुलदीप यादव भारताच्या मदतीला धावून आला. कुलदीपने डेव्हिड वॉर्नरला ५६ धावांवर असताना बाद केले. वॉर्नर स्लीपमध्ये अजिंक्य रहाणेकडे झोल सोपवून माघारी परतला. त्यानंतर उमेश यादवने शॉन मार्शलाही अवघ्या चार धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. कुलदीपने पीटर हँड्सकॉम्ब आणि मॅक्सवेलचा अडथळा दूर केला आणि कांगारुंच्या भक्कम फलंदाजीला सुरुंग लागला.

कर्णधार स्टीव्ह स्मिथने एकाकी झुंज देत कसोटी कारकिर्दीतील २० वे शतक ठोकले. स्मिथ १११ धावांवर असताना अश्विनने त्याला बाद केले. या मालिकेतील स्मिथचे हे तिसरे शतक होते. स्मिथ बाद झाल्यावर पॅट कमिन्सला कुलदीप यादवने बाद केले. कमिन्स २१ धावांवर बाद झाला. लागोपाठ धक्के बसल्यावरही मॅथ्यू वेडने दुसऱ्या बाजूने झुंजार खेळी करत संघाला २७५ चा पल्ला गाठून दिला. रविंद्र जाडेजाच्या फिरकीवर वेड (५७ धावा) बाद झाला. वेड बाद झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळले आणि अवघ्या ३०० धावांवरच कांगारुंचा डाव आटोपला. आता दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर या कसोटीचे भवितव्य अवलंबून आहे.

सामन्यांमधील रंगत, मैदानावरील आणि बाहेरील वादविवाद, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, प्रतिमा डागाळण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आदी गोष्टींमुळे भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेने आधीच कळस गाठला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या थरारानंतर मालिकेत १-१ अशी उत्कंठा टिकून आहे. शनिवारी चौथ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला. विराट कोहली दुखापतीमुळे या सामन्याला मुकला आहे. त्याच्या जागी कुलदीप यादव या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला संघात स्थान मिळाले. या संधीचे सोने करत कुलदीपने ६८ धावांमध्ये चार विकेट घेतल्या. तर उमेश यादवने दोन विकेट घेतल्या. आर.अश्विन, रविंद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक विकेट घेतली. कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे संघाची धूरा सोपवण्यात आली होती.