मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा या आश्वासक समिकरणाने भारतीय संघाला पुन्हा एकदा सावरले. तर कोहलीने कर्णधारी खेळी साकारून आणखी एका शतकी खेळीचा नजराणा पेश केला. बांगलादेशविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत मुरली विजय (१०८) आणि पुजारा (८३) यांनी संघाचा डाव सावरल्यानंतर कोहलीने दिवसाच्या अखेरीस संघाला ३ बाद ३५६ धावांपर्यंत नेले. भारती संघाने सामन्याचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण संघाला पहिल्याच षटकात बांगलादेशच्या तस्कीन अहमदने धक्का दिला. सालमीवीर केएल राहुलला अहमदने क्लीनबोल्ड केले. निराशाजनक सुरूवातीनंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा जोडी पुन्हा एकदा धावून आली. दोघांनी दुसऱया विकेटसाठी १७८ धावांची भागीदारी रचली. उपहारापर्यंत दोघांनी मैदानात जम बसवून भारताला १ बाद ८६ धावा केल्या. दुसऱया सत्रात देखील दोघांनी चांगली फलंदाजी करत संघाला दिडशेचा आकडा गाठून दिला. सामन्याच्या ५१ व्या षटकात फिरकीपटू मेहंदी हसन याने चेतेश्वर पुजाराला(८३) बाद केले. पुजारा बाद झाल्यानंतर कोहलीने कर्णधारी कामगिरी करत सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांना पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. कोहलीने दिवसाच्या तिसऱया सत्रात आपले शतक पूर्ण केले. कोहलीचे हे १६ वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक ठरले.

 

करुण नायरऐवजी संघात स्थान देण्यात आलेल्या अजिंक्य रहाणेने यावेळी कोहलीचा चांगली साथ देत. दुसरी बाजू चांगली लावून धरली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली नाबाद १११ धावांवर, तर रहाणे ४५ धावांवर नाबाद आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व दिसून आले असून दुसऱया दिवशी देखील भारतीय फलंदाज दमदार फलंदाजी करून बांगलादेशसमोर धावांचा डोंगर उभा करतील अशी आशा आहे. तत्पूर्वी, इंग्लंडसारख्या मातब्बर संघावर दमदार विजय मिळवत भारतीय संघाने मायदेशात आम्हाला कुणीही पराभूत करू शकत नाही, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताचेच पारडे जड आहे; पण दुसरीकडे बांगलादेशच्या संघाशी सामना करताना गाफील राहून चालणार नाही, कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी धावसंख्या उभारत आपली चमक दाखवली होती. कागदावर बांगलादेशपेक्षा भारत बलाढय़ दिसत आहे, पण बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय संघाला करता येणार नाही. दुसऱया दिवशी खेळपट्टीवर स्विंग मिळाल्यास बांगलादेशसाठी पुनरागमनाची संधी ठरू शकते.