लॉर्ड्सवर सोमवारी डोळ्यांचे पारणे फिटले.. जवळपास तीन दशके भारतीय संघ लॉर्ड्सवर विजयासाठी झगडत होता, पण पदरी मात्र पराभवाचे निखारे पडायचे, काही वेळा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळायचे.. पण तरीही क्रिकेटच्या पंढरीत विजयी पताका फडकावण्याचे स्वप्न पाहणे थांबले नव्हते.. मेहनत, जिद्द, चिकाटी आणि संघभावनेच्या जोरावर भारतीय संघाने स्वप्नपूर्ती केली आणि १९८६मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या पहिल्या ऐतिहासिक विजयाला पुन्हा एकदा झळाळी मिळाली.. क्रिकेटच्या पंढरीतील पाच दिवसांच्या नाटय़पूर्ण, थरारक, रंजक सामन्याचा अखेर भारताच्या दृष्टीने सुखद शेवट झाला.. इंग्लंडवर ९५ धावांनी बाजी मारत भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
फोटो गॅलरी : ‘लॉडर्स’वरील ऐतिहासिक विजयाचा प्रवास.. 
पाचव्या दिवशी इंग्लंडने चांगली सुरुवात केली तरी इशांत शर्माच्या भेदक आणि आखूड टप्प्याच्या माऱ्यापुढे त्यांनी सपशेल शरणागती पत्करली. दुसऱ्या डावात इंग्लंडला २०१ धावांमध्ये तंबूत धाडत दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयासह पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. एकेकाळी जे आखूड टप्प्याचे चेंडू भारतीय संघाचे कच्चे दुवे होते, त्याच अस्त्राचा अप्रतिम उपयोग करत इशांतने इंग्लंडच्या फलंदाजांची त्रेधा उडवली. विजयाचा शिलेदार ठरलेल्या इशांतलाच सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
फोटो गॅलरी : लॉर्डसवरील ऐतिहासिक विजयाचे शिलेदार
कसोटीच्या पाचव्या आणि निर्णायक दिवसाची संयमी सुरुवात मोईन अली आणि जो रुट यांनी केली खरी, पण या जोडीला संघाचा पराभव टाळता आला नाही. पहिल्या सत्रात रवींद्र जडेजाच्या वळणाऱ्या चेंडूवर भारताला काही संधी मिळाल्या खऱ्या, पण त्याचे सोने त्यांना करता आले नाही. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी रचत इंग्लंडला आशा दाखवली होती. इशांतच्या ७४व्या षटकात रुटने तीन चौकार लगावत अर्धशतक साजरे केले. पण उपाहाराला जाण्यापूर्वी फक्त एका षटकापूर्वी इशांतच्या ‘बाउन्सर’वर अलीने आपला ‘बळी’ आंदण दिला. इंग्लंडचे फलंदाज ‘बाउन्सर’वर आक्रमण करतात, हे पाहून इशांतने आखूड टप्प्यांचा मारा सुरू केला आणि इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स भारताला बहाल केल्या.
कपिलच्या पराक्रमामुळे लॉर्ड्सवर इतिहास घडला! 
दिवसाची सुरुवात धोनीने जडेजा आणि शर्मा यांच्याककडून केली, पण यश काही पदरात पडत नव्हते. त्यानंतर इशांतला ७४व्या षटकात पुन्हा गोलंदाजीला आणले, या षटकात इंग्लंडच्या फलंदाजांनी १४ धावा लुटल्या. त्यानंतरच्या ७६व्या षटकात इशांतने मोईन अलीला बाद केले. ८०व्या षटकात त्याने मॅट प्रायरला तंबूत धाडले. त्यानंतरच्या ८२व्या षटकात बेन स्टोक्स आणि रुट यांना बाद करत सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवला. ८६व्या षटकात त्याने ब्रॉडचा काटा काढला. या स्पेलमध्ये इशांतने ८ षटकांमध्ये पाच विकेट्स मिळवले, तर डावात एकूण सात बळी पटकावले. चौथ्या डावात आशिया खंडाबाहेर सात बळी मिळवणारा इशांत पहिला भारतीय गोलंदाज ठरला. ८९व्या षटकात जडेजाने जेम्स अँडरसनला धावबाद केले आणि मैदानात एकच जल्लोष झाला. स्टेडियममध्ये भारताच्या विजयाचे गीत घुमू लागले.
धावफलक
भारत (पहिला डाव) : २९५
इंग्लंड (पहिला डाव) : ३१९
भारत (दुसरा डाव) : ३४२
इंग्लंड (दुसरा डाव) : सॅम रॉबसन पायचीत गो. जडेजा ७, अ‍ॅलिस्टर कुक झे. धोनी गो. इशांत शर्मा २२, गॅरी बॅलन्स झे. धोनी. गो. मोहम्मद शमी २७, इयान बेल त्रि.गो. इशांत शर्मा १, जो रुट झे. बिन्नी गो. इशांत शर्मा ६६ ,मोइन अली झे. पुजारा गो. इशांत शर्मा ३९, मॅट प्रायर झे. विजय गो. इशांत शर्मा १२, बेन स्टोक्स झे. पुजारा गो. इशांत शर्मा ०, ख्रिस ब्रॉड झे. धोनी गो. इशांत शर्मा ८, लायम प्लंकेट नाबाद ७, जेम्स अँडरसन धावचीत २, अवांतर (बाइज १३, लेग बाइज १६, वाइड १, नो बॉल २)३२, एकूण ८८.२ षटकांत सर्व बाद २२३.
बाद क्रम : १-१२, २-७०, ३-७१, ४-७२, ५-१७३, ६-१९८, ७-२०१, ८-२०९, ९-२१६, १०-२२३.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १६-७-२१-०, मोहम्मद शमी ११-३-३३-१, इशांत शर्मा २३-६-७४-७, रवींद्र जडेजा ३२.२-७-५३-१, मुरली विजय ४-१-११-०, शिखर धवन २-०-२-०.
सामनावीर : इशांत शर्मा.

भारतीय संघातील अनेक जण इंग्लंडमध्ये कसोटी खेळलेले नाही. परंतु तरीही संघाची कामगिरी अप्रतिम झाली. त्यांचा दृष्टीकोनही लाजवाब होता. त्यामुळे भारतीय संघाला लॉर्ड्सवर संस्मरणीय विजय नोंदवता आला.वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल वातावरण असल्याने नाणेफेकीचा कौल अतिशय महत्त्वाचा होता. परंतु आमच्या फलंदाजीच्या फळीने अतिशय समाधानकारक कामगिरी केली आहे. २०११च्या मालिकेतून आम्ही खूप शिकलो आहोत. तिसऱ्या दिवसापर्यंत तुम्ही चिवट झुंज देऊ शकलात तर फिरकी गोलंदाजांना आपली उपयुक्तता सिद्ध करता येऊ शकते. रवींद्र जडेजाने या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अधिकाधिक कसोटी सामन्यांच्या अनुभवानंतर तो चांगला कसोटी फलंदाज होऊ शकेल. त्याचे तंत्र अतिशय चांगले आहे. परंतु त्याचा स्वत:च्या क्षमतेवर अधिक विश्वास हवा.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

हा अतिशय दु:खद पराभव आहे. या विजयासाठी भारतीय संघाला श्रेय द्यावे लागेल. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाडय़ांवर त्यांनी सर्वोत्तम खेळ करत आम्हाला निष्प्रभ ठरवले. खेळपट्टी फिरकीला अनुकूल होती. चेंडूला उसळीही मिळत होती. नाणेफेक जिंकण्याचा निर्णय चांगलाच होता. मात्र भारतीय संघाने शानदार खेळ केला. काही खेळाडू देशाप्रती चांगली कामगिरी करत आहेत. त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. मॅट प्रॉयर हा आमच्या संघाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. संघर्ष करणारा हा गुणी खेळाडू आहे, तो पुन्हा फॉर्ममध्ये परतेल याची खात्री आहे. कर्णधार म्हणून संघाला जिंकून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नजीकच्या भूतकाळात कर्णधार म्हणून माझी कामगिरी चांगली झालेली नाही. मात्र माझ्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडचा संघ जिंकलाही आहे हे विसरुन चालणार नाही. मला धावा करून संघासमोर उदाहरण ठेवणे आवश्यक आहे.
अ‍ॅलिस्टर कुक, इंग्लंडचा कर्णधार  

अभिमानास्पद विजय!
भारतीय क्रिकेटपटूंनी इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर पराभूत करीत देशाला अभिमानास्पद वाटावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांत अनेक ज्येष्ठ व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भारतीय संघाचे कौतुक केले.

उपहारानंतरचा एक तास इंग्लंडसाठी घातक ठरला. इशांत शर्माने सात बळी घेत भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा इंग्लंडचा निर्णय आत्मघातकी ठरला. इंग्लंड संघात खूप बदल करण्याची आवश्यकता आहे.
    -शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू

आपल्या देशातील प्रत्येकाला अभिमानास्पद वाटावी अशीच कामगिरी महेंद्रसिंग धोनी व त्याच्या सहकाऱ्यांनी केली आहे. भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करीत इंग्लंडचा धुव्वा उडविला आहे. संघाच्या या विजयात प्रत्येक खेळाडूचा महत्त्वाचा वाटा आहे. लॉर्ड्ससारख्या प्रतिष्ठेच्या मैदानावर हे यश मिळवत सर्वासाठी प्रेरणादायक कामगिरी भारताने केली आहे.
      -व्ही.व्ही.एस.लक्ष्मण, भारताचा माजी फलंदाज

उपहारानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. अर्थात त्याचे श्रेय इशांतच्या अचूक व भेदक माऱ्याला द्यावे लागेल. पाचही दिवस इंग्लंडच्या तुलनेत भारताचीच कामगिरी सरस ठरली आहे. भारतीय खेळाडू खरोखरच विजयाला लायक आहेत.
    -संजय मांजरेकर, भारताचा माजी फलंदाज

इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर लोळवणे हे शिवधनुष्य भारतीय खेळाडूंनी पेलले व संस्मरणीय विजय मिळविला आहे. लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघाकडून इंग्लंडचा संघ पराभूत होऊ शकतो हे धोनी व त्याच्या सहकाऱ्यांनी दाखविले आहे.
    -बिशनसिंग बेदी, भारताचे माजी कप्तान

विलक्षण विजय! भारतीय संघाने देशातील प्रत्येकाला अभिमान वाटावा अशीच कामगिरी केली आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचा तसेच संघाच्या सपोर्ट स्टाफचा या विजयात महत्त्वाचा वाटा आहे.
        -नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान