* पंचकासह अश्विनची १५० व्या बळीची नोंद
* जडेजा, मिश्राची सुरेख साथ; पुजाराची अर्धशतकी खेळी
एकदिवसीय मालिकेत रवीचंद्रन अश्विनला दुखापत झाली आणि भारताचे फिरकी आक्रमण कमकुवत झाले. याची परिणती भारताच्या मालिका पराभवात झाली. पहिल्या कसोटीसाठी अश्विन तंदुरुस्त होऊन परतला. अवघ्या दोनशे धावांचे पाठबळ असताना आपल्या उपयुक्ततेची झलक सादर करत अश्विनने पाच बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. अश्विनला रवींद्र जडेजा आणि अमित मिश्रा यांनी पुरेपूर साथ दिल्याने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १८४ धावांतच आटोपला आणि भारताला १७ धावांची अल्प आघाडी मिळाली. आफ्रिकेच्या दहाही फलंदाजांनी भारताच्या फिरकीसमोर लोटांगण घातले. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी जिद्दीने खेळ करत भारताला १४२ धावांची आघाडी गाठून दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या २ बाद १२५ धावा झाल्या आहेत. पुजारा ६३ तर कर्णधार कोहली ११ धावांवर खेळत आहेत.
२ बाद २८ वरून पुढे खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डावाला डीन एल्गर आणि हशिम अमला यांनी आकार दिला. खेळपट्टीवर स्थिरावलाय असे वाटत असतानाच अश्विनच्या गोलंदाजीवर स्वीपचा फटका खेळण्याचा एल्गरचा प्रयत्न फसला. त्याने ३७ धावा केल्या. एकदिवसीय मालिकेत भारतीय गोलंदाजांना तडाखा देणाऱ्या एबी डी’व्हिलियर्सला जीवदान मिळाले. जडेजाच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने त्याचा झेल टिपला. मात्र चेंडू नोबॉल असल्याचे रिप्लेत स्पष्ट झाल्याने डी’व्हिलियर्सला पुन्हा बोलावण्यात आले. भरवशाचा अमला संघाला तारणार असे चित्र असताना अश्विननेच त्याला माघारी धाडले. त्याने ४३ धावा केल्या.
दुसरी कसोटी खेळणाऱ्या डेन व्हिलासला तंबूत परतवत अश्विनने दक्षिण आफ्रिकेला अडचणीत टाकले. बचावाचे धोरण अपयशी ठरत असल्याने डी’व्हिलियर्सने नेहमीचे आक्रमक धोरण स्वीकारले. प्रत्येक षटकात किमान एक चौकार असा पवित्रा घेत डी’व्हिलियर्सने धावफलक हलता ठेवला. त्याने सहाव्या विकेटसाठी फिलँडरसह २९ तर सातव्या विकेटसाठी सिमोन हार्मेरसह ३४ धावांची भागीदारी केली. जडेजाच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार वसूल करत डी’व्हिलियर्सने अर्धशतक पूर्ण केले. जडेजाने फिलँडरचा अडसर दूर केला तर मिश्राने हार्मेरचे आव्हान संपुष्टात आणले. डेल स्टेनला झटपट माघारी धाडत जडेजाने अश्विनला पुरेपूर साथ दिली.
अमित मिश्राच्या एका सुरेख चेंडूवर डी’व्हिलियर्स बाद झाला आणि आफ्रिकेचा प्रतिकारही मंदावला. त्याने ६ चौकारांच्या साथीने ६३ धावांची खेळी केली. वेगवान खेळीनिशी आघाडी घेण्याचा डी’व्हिलियर्सचा मनसुबा होता. मात्र मिश्राच्या अफलातून चेंडूने एबीची खेळी संपुष्टात आणली. इम्रान ताहीरला पुजाराकडे झेल देण्यास भाग पाडत अश्विनने डावातल्या पाचव्या बळीची नोंद केली. या विकेटसह अश्विनने कसोटी कारकीर्दीत १५० बळी मिळवण्याची किमया केली. दक्षिण आफ्रिकेचा डाव १८४ धावांत आटोपला आणि भारताला १७ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. जडेजाने ३ तर मिश्राने २ बळी घेत अश्विनला तोलामोलाची साथ दिली.
आघाडी वाढवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्याच षटकात धक्का बसला. दोन वर्षांपूर्वी मोहालीच्याच मैदानावर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाविरुद्ध दीडशतकी खेळीसह दिमाखदार पदार्पण करणाऱ्या शिखर धवनला दुसऱ्या डावातही भोपळाही फोडता आला नाही. फिलँडरनेच त्याला बाद केले. या धक्क्यातून सावरत मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा जोडीने ८६ धावांची संयमी भागीदारी केली. असमान उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर, यष्टीभोवती पाच क्षेत्ररक्षक असतानाही या जोडीने एकेरी-दुहेरी धावा आणि चौकार यांची योग्य मिलाफ साधत धावफलक हलता ठेवला. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य अस्त्र असलेल्या डेल स्टेनने दुखापतीमुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही. याचाही भारतीय फलंदाजांनी फायदा उठवला. अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या विजयला ताहीरने बाद केले. बदली खेळाडू तेंदा बावूमाने त्याचा अफलातून झेल घेतला. विजयने ४७ धावांची खेळी केली. पहिल्या डावात झटपट माघारी परतलेल्या कर्णधार कोहलीने सावधपणे सुरुवात केली. एल्गरच्या गोलंदाजीवर चौकार खेचत पुजाराने अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत या जोडीने किल्ला लढवला. दरम्यान जांघेच्या दुखापतीमुळे डेल स्टेन तिसऱ्या दिवशी खेळू शकणार नसल्याचे दक्षिण आफ्रिका संघव्यवस्थपनाने स्पष्ट केले.

१५० इम्रान ताहीरला बाद करत रविचंद्रन अश्विनने कारकीर्दीतील १५०व्या बळीची नोंद केली. भारतीय कसोटी इतिहासात सगळ्यात जलद १५० बळी मिळवण्याचा विक्रम अश्विनने २९व्या कसोटीत नावावर केला. आक्रमणाची सुरुवात करून ५० बळी पटकावणारा तो गेल्या शतकभरातला पहिलाच गोलंदाज आहे. अश्विनने कॉलिन ब्लायथ, ह्य़ूज ट्रम्बल, आर.पील, जी.ई. पाल्मर यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

धावफलक
भारत (पहिला डाव) : २०१
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव)
डीन एल्गर झे. जडेजा गो. अश्विन ३७, स्टॅनिअन व्हॅन झील पायचीत गो. अश्विन ५, फॅफ डू प्लेसिस त्रि.गो. जडेजा ०, हशिम अमला यष्टीचीत साहा गो. अश्विन ४३, एबी डी’व्हिलियर्स त्रि.गो. मिश्रा ६३, डेन व्हिलास झे. जडेजा गो. अश्विन १, व्हरनॉन फिलँडर झे. रहाणे गो. जडेजा ३, सिमोन हार्मेर पायचीत गो. मिश्रा ७, डेल स्टेन यष्टीचीत साहा गो. जडेजा ६, कागिसो रबाडा नाबाद १, इम्रान ताहीर झे. पुजारा गो. अश्विन ४; अवांतर (बाइज ६, लेगबाइज ७, नोबॉल १) १४ एकूण : ६८ षटकांत सर्वबाद १८४
बादक्रम : १-९, २-९, ३-८५, ४-१०५, ५-१०७, ६-१३६, ७-१७०, ८-१७९, ९-१७९, १०-१८४
गोलंदाजी : रवीचंद्रन अश्विन २४-५-५१-५, उमेश यादव ६-१-१२-०, वरुण आरोन ८-१-१८-०, रवींद्र जडेजा १८-०-५५-३, अमित मिश्रा १२-३-३५-२
भारत (दुसरा डाव) :शिखर धवन झे. डी’व्हिलियर्स गो. फिलँडर ०, मुरली विजय झे. बदली खेळाडू (बावूमा) गो. ताहीर ४७, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ६३, विराट कोहली खेळत आहे ११. एकूण (बाइज ४) ४
एकूण : ४० षटकांत २ बाद १२५
गोलंदाजी : व्हरनॉन फिलँडर ७-०-१७-१, सिमोन हार्मेर १०-३-२८-०, डीन एल्गर ७-१-३४-०, इम्रान ताहीर ८-०-३३-१, कागिसो रबाडा ८-५-९-०.

खेळपट्टीला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. बहुतांशी फलंदाजांनी खराब फटके मारून आपली विकेट बहाल केली. डीन एल्गरच्या फलंदाजीचा यूटय़ूबच्या माध्यमातून अभ्यास केला होता. या खेळपट्टीवर योग्य वेगाने गोलंदाजी करणे आवश्यक आहे. मी चुकांमधून पटकन शिकलो. दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल आहे. त्यामुळे बळी मिळवण्यासाठी ठोस रणनीतीसह संयम अत्यावश्यक आहे.
रविचंद्रन अश्विन