द.आफ्रिकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना जिंकून भारतीय संघाने आफ्रिकेच्या विजयी अश्वमेधाला लगाम घातला. इंदुरच्या स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने द.आफ्रिकेवर २२ धावांनी विजय मिळवला.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाबाद ९२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. धोनीच्या नाबाद ९२ धावांच्या बळावर भारतीय संघाला द.आफ्रिकेसमोर २४८ धावांचे आव्हान उभे करता आले. तर, भारताच्या या समाधानकारक आव्हानाचा पाठलाग करताना द.आफ्रिकेला २२५ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत द.आफ्रिकेचा डाव ४३.३ षटकांत संपुष्टात आणला. भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. हरभजन सिंगने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्या तर, उमेश यादव आणि मोहित शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना द.आफ्रिकेची सुरूवात चांगली झाली होती. सलामी जोडी घातक होऊ लागली असतानाच फिरकीपटू अक्षर पटेलने सलामीवीर हशीम अमलाला(१७) बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. तर, हरभजन सिंगने क्विंटन डी.कॉकला(३४) झेलबाद करून माघारी धाडले. त्यानंतर फॅफ डू प्लेसिस आणि जे.पी.ड्युमिनी यांनी अर्धशतकी भागीदारी रचून संघाला सावरले. भारताची डोकेदुखी वाढवणाऱया या जोडीला अखेर अक्षर पटेलने फोडले. पटेलने ड्युमिनीला(३६) पायचीत करून संघाला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर तुफान फटकेबाजीसाठी ओळख असलेल्या डेव्हिड मिलरला भुवनेश्वर कुमारने शून्यावरच चालते केले. फॅफ डू प्लेसिस मात्र मैदानात ठाण मांडून होता. डू प्लेसिसने ५६ चेंडूत आपले अर्धशतक गाठले. पण पुढच्याच चेंडूवर अक्षर पटेलने डू प्लेसिसची विकेट घेतली आणि भारताने सामन्यावर पकड निर्माण केली. द.आफ्रिकेचा कर्णधार ए.बी.डिव्हिलियर्स मैदानात संयमी खेळ करून संघाच्या धावसंख्येला सावरण्याचा प्रयत्न केला. पण, विराट कोहलीने डी’व्हिलियर्स उत्कृष्ट झेल टिपून त्याला तंबूत धाडले. डीव्हिलियर्स बाद झाल्यानंतर आफ्रिकेचा संपूर्ण डाव कोसळला. ठराविक अंतराने आफ्रिकेचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांचा डाव २२५ धावांत संपुष्टात आला.

दरम्यान, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत द.आफ्रिकेसमोर २४८ धावांचे आव्हान ठेवले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद ९२ धावांच्या बळावर भारतीय संघाला द.आफ्रिकेसमोर दोनशे धावांचा टप्पा गाठता आला. पहिल्या सामन्यात अपेक्षित विजय मिळवून न देऊ शकल्यामुळे टीकेचा भडिमार होत असताना धोनीने दुसऱया सामन्यात महत्त्वाच्या क्षणी मैदानात टिच्चून फलंदाजी करून संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. भारताचा निम्मा संघ १५० धावांच्या आतच बाद झाला असताना धोनीने सुरूवातीला संयमी फलंदाजी करत मैदानात जम बसवला आणि अर्धशतक गाठले. अर्धशतक साकारल्यानंतर धोनीच्या फलंदाजीला बहर आला आणि सामन्याच्या शेवटच्या षटकांत धोनीने आपल्या भात्यातील अस्त्र काढण्यास सुरूवात केली. धोनीने अखेरच्या षटकापर्यंत मैदानात उभे राहून नाबाद ९२ धावांचे योगदान दिले. तर, हरभजन सिंगनेही शेवटच्या षटकांत धोनीला साथ देत २२ धावा केल्या.

सामन्याच्या सुरूवातीला रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे तीन शिलेदार स्वस्तात तंबूत दाखल झाल्याने संघ बॅकफूटवर आला. रहाणेने प्रयत्न केला खरा पण मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले. रहाणेने अर्धशतकी खेळी साकारली. रहाणे बाद झाल्यानंतर सुरेश रैना आल्या पावलीच माघारी परतला. त्यानंतर अक्षर पटेलला(१३) द.आफ्रिकेच्या डेल स्टेनने चालते केले. त्यानंतर संघाच्या धावसंख्येची संपूर्ण मदार धोनीच्या खांद्यावर आली. धोनीने ही जबाबदारी पेलत संघ अडचणीत असताना ९२ धावांची खेळी करून संघाला सावरले. भारतीय संघाने या विजयासह पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत द.आफ्रिकेसोबत १-१ अशी बरोबरी केली आहे.

धावफलक-
भारत- ९ बाद २४७ (५० षटके)
द.आफ्रिका- २२५ (४३.३ षटके)

सामनावीर-
महेंद्रसिंग धोनी (९२*)