श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱया कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव ३९३ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना यजमानांनी चोख प्रत्युत्तर दिले. दुसऱया दिवसाअखेर श्रीलंकेची धावसंख्या ३ बाद १४० अशी समाधानकारक करून भारताकडे अजून २५३ धावांची आघाडी आहे. श्रीलंकेच्या पहिल्या दोन फलंदाजांना स्वस्तात बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले होते. उमेश यादवने अचूक मारा करीत करुणारत्ने याला माघारी धाडून संघाला पहिले यश मिळवून दिले, तर कुमार संगकाराची विकेट आर.अश्विनने घेतली. संगकाराने ३२ धावा केल्या. मात्र, हे दोघेही बाद झाल्यानंतर कौशल सिल्व्हाने संयमी खेळी करीत अर्धशतकी खेळी केली. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज(१९), तर लहिरू थिरीमाने(२८) धावांवर खेळत होते.
दिवसाच्या सुरूवातीला भारतीय फलंदाज ठराविक अंतराने एकामागोमाग एक बाद होत गेले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत स्टुअर्ट बिन्नी आणि आर.अश्विन यांना स्वस्तात बाद केले. अष्टपैलू म्हणून संघात संधी मिळालेला स्टुअर्ट बिन्नी १० धावांवर बाद झाला, तर अश्विन देखील आल्या पावलीच माघारी परतला. अशावेळी वृद्धीमान साहाने संयमी खेळ करीत मैदानात जम बसवला आणि कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक गाठले. मात्र, त्याला दुसऱया बाजूने तोलामोलाची साथ मिळू शकली नाही. अमित मिश्राने प्रयत्न केले खरे पण तो २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर वृद्धीमान साहाला रंगना हेराथने ५६ धावांवर पायचीत बाद केले. त्यामुळे संघाला ४०० चा आकडा गाठता आला नाही आणि भारतीय संघाचा डावा ३९३ धावांत संपुष्टात आला.