सुरूवातीच्या धक्क्यांनंतर भारताचा डावाला आकार देणारे विराट कोहली आणि सुरेश रैना एकापाठोपाठ बाद झाले. या दोघांनी मधल्या षटकांमध्ये उत्तम फलंदाजी करत ६२ धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर होत असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन ही सलामीची जोडी लवकर तंबूत परतल्यामुळे नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय काहीसा चुकीचा ठरताना दिसत होता. वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेरोम टेलरने शिखर धवनला अवघ्या एका धावेवर त्रिफळाचीत केले. तर ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेने डॅरेन सॅमीकडे झेल दिला. त्याने १२ धावा केल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अंबाती रायडू आणि विराट कोहलीने भारताचा डाव काहीसा सावरण्याचा प्रयत्न केला. पण अंबाती रायडू ३२ धावा करून तंबूत परतला.