अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेत दाखल झालेल्या भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय लढतीत ८३ धावांनी दणदणीत विजय साजरा करून ‘अजिंक्य’ राहण्याचा मान पटकावला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने यजमान झिम्बाब्वेची ३-० अशी शुभ्र धुलाई केली. अखेरच्या सामन्यात केदार जाधवने खणखणीत शतक झळकावून भारताला ४ बाद ८२ अशा दयनीय अवस्थेतून ५ बाद २७६ अशी दमदार मजल मारून दिली. या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यजमानांचा डाव भारतीय गोलंदाजांनी १९३ धावांत गुंडाळला. शतकवीर केदार जाधवला सामनावीराचा किताब देण्यात आला.
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजाचे आमंत्रण दिले. अजिंक्य रहाणे (१५), मुरली विजय (१३), रॉबिन उथप्पा (३१) आणि मनोज तिवारी (१०) हे आघाडीचे फलंदाज धावफलकावर ८२ धावा असताना माघारी परतले. ४ बाद ८२ अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या भारताच्या मदतीला जाधव-पांडे धावून आले. या दोघांनी धावांचा डोंगर उभा करताना यजमानांच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. जाधवने ८७ चेंडूंत १२ चौकार आणि एक षटकार खेचून नाबाद १०५ धावांची खेळी केली, तर पांडेने ८६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून ७१ धावा केल्या. या जोडीला झिम्बाब्वेच्या गचाळ क्षेत्ररक्षकांनीही मदत केली आणि त्यांनी पाचव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली.
४७ व्या षटकात चामू चिभाभा याने पांडेला बाद करून ही जोडी फोडली. मात्र जाधवने एका बाजूने फटकेबाजी करताना शेवटच्या ३ षटकांत ४४ धावा चोपल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना यजमानांची दैना उडाली. चामू चिभाभा (८२) आणि रेगिस चकाब्वा (२७) वगळता इतर फलंदाजांनी भारतासमोर नांगी टाकली.  चिभाभा आणि चकाब्वा यांनी ७० धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर चकाब्वा त्रिफळाचीत होऊन माघारी परतल्यानंतर यजमानांचा डाव गडगडला. चिभाभा  संयमाने खेळ करीत होता, परंतु त्याला इतरांनी साथ दिली नाही. चिभाभाने १०९ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ८२ धावांची खेळी केली. धावफलकावर ४ बाद १६० धावा असताना तो स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

स्कोअरकार्ड-