मोहाली कसोटीत भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघावर १०८ धावांनी मिळवला. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही प्रभावी मारा करत आफ्रिकन संघाचा डाव अवघ्या १०९ धावांमध्ये गुंडाळला. फिरकीपटू रविंद्र जाडेजाने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक पाच बळी मिळवले. अश्विन आणि अमित मिश्रा यांनी अनुक्रमे तीन आणि एक बळी मिळवत जाडेजाला योग्य साथ दिली. तत्पूर्वी मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव २०० धावांत आटोपला. भारताचे शेवटचे सहा फलंदाज अवघ्या २४ धावांत बाद झाले. पुजारा आणि कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पहिल्या डावातील १७ धावांच्या आघाडीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २१८ धावांचे लक्ष्य दिले आहे.  मात्र, संपूर्ण सामन्यादरम्यान, खेळपट्टीचा नूर पाहता हे आव्हान आफ्रिकेला जड जाणार याचा सगळ्यांनाच अंदाज होता.
तिस-या दिवशीही खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांची जादू दिसून आली. हार्मर आणि ताहीरने प्रत्येकी चार गडी बाद केले. फिलँडर आणि व्हॅन झीलने एक गडी बाद केला.