भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) धरमशाला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘जम्बो’च्या अर्थात अनिल कुंबळेच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पुढील एका वर्षासाठी अनिल कुंबळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळतील, असे  बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

कुंबळेच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९५६ बळी आहेत. याशिवाय, कुंबळेने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मेन्टॉर म्हणून काम पाहिले आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी एकूण ५७ अर्ज आले होते. या अर्जाची छाननी करून २१ उमेदवारांची निवड करण्यात आली होती. प्रशिक्षकला हिंदी बोलता आलं पाहिजे अशी अट यावेळी बीसीसीआयने ठेवली होती. त्यामुळे संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी यंदा भारतीय खेळाडूची निवड होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. प्रशिक्षकपदासाठीच्या इच्छुकांमध्ये रवी शास्त्री, अनिक कुंबळे आणि प्रवीण अमरे यांची नावे आघाडीवर होती. अखेर कुंबळेने बाजी मारली. प्रशिक्षकपदासाठी उमेदवारांनी बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीपुढे सादरीकरण केले होते. या समितीमध्ये माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही.व्ही. एस. लक्ष्मण यांनी या वेळी सर्व उमेदवाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती दरम्यान अनिल कुंबळने आपल्या तिन्ही माजी सहकाऱयांचे मन जिंकल्याचेही सांगण्यात आले होते. दरम्यान, अनिल कुंबळेची मुख्य प्रशिक्षपदी निवड झाली असली तरी ती केवळ एका वर्षासाठी करण्यात आली आहे.