बांगलादेशपाठोपाठ झिम्बाब्वेविरुद्धही भारत पराभवाचे पाढे वाचणार, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना अखेरच्या षटकांमध्ये अचूक मारा केल्यामुळे भारताला रोमहर्षक लढतीत झिम्बाब्वेवर ४ धावांनी विजय मिळवता आला. झिम्बाब्वेच्या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात यजमानांनी भारताला चांगलेच धारेवर धरत अर्धा संघ ८७ धावांत गुंडाळला होता, पण अंबाती रायुडूचे नाबाद शतक आणि स्टुअर्ट बिन्नीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताला झिम्बाब्वेपुढे २५६ धावांचे आव्हान ठेवता आले. झिम्बाब्वेचा कर्णधार एल्टन चिगुंबुराने एकाकी झुंज दिली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला चौथ्याच षटकात मुरली विजयच्या (१) रूपात पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेचा (३४) संघाला सावरण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मग २७ धावांमध्ये भारताने तीन फलंदाज गमावले आणि त्यांची २४.२ षटकांत ५ बाद ८७ अशी अवस्था झाली. या वेळी अडचणीत सापडलेल्या भारताला आधार दिता तो रायुडूने. शांतचित्तपणे शैलीदार फटक्यांचा नमुना पेश करून रायुडूने चौफेर फटकेबाजी करीत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. रायुडूला आणि बिन्नी (७७) यांनी सहाव्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. रायुडूने १२ चौकार व एका षटकाराच्या जोरावर १२४ धावांची अतुलनीय खेळी साकारली.
भारताच्या २५६ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचे फलंदाज एकामागून एक फलंदाज बाद झाले. पण चिगुंबुराने एकाकी झुंज देत  झिम्बाब्वेचे आव्हान जिवंत ठेवले होते. पण अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ त्याला लाभली नाही. चिंगुंबुराने १०१ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद १०४ धावांची खेळी साकारली.

लाइव्ह स्कोअर-