होंडुरासवर ३-० अशी सहज मात; ब्रेनर विजयाचा शिल्पकार

जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ज्वर पाहायला मिळाला तो फुटबॉलसाठी जगविख्यात असलेल्या ब्राझीलचाच. आपल्या नजाकतभऱ्या खेळाच्या जोरावर त्यांनी कोचीवासियांना आपलेसे करत कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी आरामात गाठली. जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या ब्राझीलने उपउपांत्यपूर्व फेरीत होंडुरासवर ३-० असा सहज विजय मिळवला. ब्रेनर ब्राझीलच्या विजयाचा शिल्पकार ठरला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांना बलाढय़ जर्मनी संघाचा सामना करावा लागणार आहे.

एखाद्या बलवान संघाचा कसा सहज, सुंदर खेळ असावा, याचा उत्तम वस्तुपाठ ब्राझीलने होंडुरासविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिला. ब्रेनरने सामन्याच्या ११व्या मिनिटाला पहिला गोल करत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर ब्राझीलचा संघ संयतपणे आपल्या चाली रचत होता. मध्यंतराला काही मिनिटे शिल्लक असताना ब्राझीलने दुसरा गोल लगावला. सामन्याच्या ४४व्या मिनिटाला एम. अँटोनियाने ब्राझीलसाठी दुसरा गोल करत त्यांची आघाडी दुप्पट केली. मध्यंतराच्यावेळी ब्राझीलचा संघ २-० असा आघाडीवर होता. मध्यंतरापर्यंत ब्राझीलने सामना जवळपास जिंकला होता. दुसऱ्या सत्रात मात्र त्यांनी खेळाडू जायबंदी होऊ नयेत, यावर भर देण्याचे ठरवले. त्यामुळे दुसऱ्या सत्रात त्यांनी शांतपणे खेळ केला. ब्रेनरने सामन्याच्या ५६व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा गोल करत संघाची आघाडी वाढवली.

ब्राझीलचे दोन गोल यावेळी होंडुरासचा गोलरक्षक अ‍ॅलेक्स रीव्हेराने अडवले. १४व्या मिनिटाला ब्राझीलच्या पॉलिन्हो आणि २१व्या मिनिटाला अ‍ॅलन यांनी गोल करण्याचा प्रयत्न केला, पण अ‍ॅलेक्सने तो हाणून पाडला.

साखळी सामन्यांमध्ये ब्राझीलने बलाढय़ स्पेनवर २-१ असा विजय मिळवला होता, त्यानंतर उत्तर कोरिया आणि नायजर यांच्यावर प्रत्येकी २-० असा फरकाने सहज मात केली होती.

ब्राझीलचा मध्यरक्षक अ‍ॅलनला नाजयरविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात खेळता आले नव्हते. कारण त्यापूर्वीच्या सामन्यात त्याला पिवळे कार्ड देण्यात आले होते. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून अ‍ॅलन नायजरविरुद्ध खेळला नव्हता. पण होंडुरासविरुद्धच्या सामन्यात ब्रेनरने जो पहिला गोल केला, त्याला अ‍ॅलनने सहाय्य केले होते.