उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्याची कोलकातावासियांना पर्वणी

‘फुटबॉलच्या देशा’ असं ज्यांचं वर्णन केलं जातं, ज्यांच्या रक्तामध्ये फुटबॉलच वाहत असतो, फुटबॉलचे वाघ, असं ज्यांना म्हटलं जातं, तो ब्राझीलचा संघ. कुमार (१७ वर्षांखालील) फुटबॉल विश्वचषकात या वाघांच्या बछडय़ांना सामना करावा लागणार आहे तो ‘थ्री लायन्स’ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या इंग्लंडच्या ‘छाव्यांशी’. त्यामुळे ही उपांत्य फेरीची लढत रंगणार आहे ती इंग्लंडचे छावे आणि ब्राझीलच्या बछडय़ांमध्ये.

ब्राझील आणि इंग्लंड या दोन्ही संघांना आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये एकही पराभव पत्करावा लागला नाही. पण पॉलिन्हो, ब्रेनर आणि लिंकॉन या तिन्ही खेळाडूंनी आतापर्यंत लौकिकाला साजेसा खेळ करत ब्राझीलला यश मिळवून दिले आहे. आतापर्यंत ब्राझीलने ११ गोल केले आहेत आणि यामध्ये या तिघांचा मोठा वाटा आहे. पण ब्राझीलवर आतापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये फक्त दोनच गोल झाले आहेत आणि हे दोन गोल स्पेन आणि जर्मनीसारख्या बलाढय़ा संघांनी केले आहेत. ब्राझीलचा बचाव चांगला होत असला तरी त्यांचा गोलरक्षक गॅब्रिएल बाझाओ याने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आतापर्यंत ८८.९ टक्के गोल त्याने बचावले आहेत. उपांत्यपूर्व लढतीत जर्मनीने पहिल्या सत्रात गोल केला होता आणि ब्राझीलला ७० मिनिटांपर्यंत एकही गोल करता आला नव्हता. पण या कठीण परिस्थितीवरही त्यांनी मात केली. त्यानंतर सात मिनिटांत त्यांनी दोन गोल करत आपले आक्रमण कोणत्या दर्जाचे आहे, हे फुटबॉल विश्वाला दाखवून दिले आहे. पण दुखापतींचा ससेमिरा त्यांच्या पाठीशी कायम राहिला आहे, त्यामुळे ब्राझीलचा संघ पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची नामी संधी असेल.

जपानविरुद्धच्या सामन्यात त्यांचा मुख्य आक्रमणपटू जॅडोन सँचो खेळला नव्हता आणि याचा काहीसा फटका इंग्लंडचा बसला होता. हा सामना पेनेल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडने जिंकला होता. सँचो साखळी सामन्यानंतर बुंदेसलिगा लीगसाठी रवाना झाल्यामुळे इंग्लंडला त्याची जागा भरून काढणे, सोपे नसेल. पण अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात रिआन ब्रेवस्टरने हॅट्ट्रिक करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.

प्रतिस्पर्धी संघ

ब्राझील : गॅब्रिएल ब्राझाओ, वेस्ली व्हिटाओ, लुका हॉल्टर, व्हिक्टर बॉबसिन, वेव्हेरसन, पॉलिन्हो, मार्कोस अँटोनिओ, लिन्कॉन, अ‍ॅलन, लुकाओ, मॅथेअस स्टोक्ल, रॉड्रिगो गुथ, लुआन कँडिडो, व्हिटर यॅन, रॉड्रिगो नेस्टॉर, व्हिटिन्हो, युरी अल्बेट्रो, ब्रेनर, युरी सेना.

इंग्लंड : कर्टीस अँडरसन, जोसेफ बुरसिक, विल्यम क्रेलिन, टिमोथी इओमा, जोएल लॅटिब्युडिइर, मर्क गुइही, जोनाथन पांझो, लुईस गिब्सन, स्टीव्हन सेसेगनॉन, मॉर्गन गिब्स व्हाइट, ताशान ऑक्ली बुथे, कोनोर कॉलाघेर, अँजेल गोम्स, नीआ किर्बी, जॉर्ज मॅकइचरन, कॅलम हडसन ओडोई, फिलीप फोडेन, इमिल स्मिथ रोव, रिआम ब्रेवस्टर, डॅनियल लोडर.