होंडुरासने कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेतील दुसऱ्या सामन्यात नवख्या न्यू कॅलेडोनिया संघावर ५-० असा शानदार विजय मिळवला. त्यामुळे कॅलेडोनियाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. कार्लोस मेजिया (२५व्या आणि ४२व्या मि.) आणि पॅट्रिक पॅलाकियोस (५१व्या आणि ८८व्या मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल झळकावले, तर जोशुआ कॅनालिसने २७व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवला. विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीत होंडुरासचा जपानने धुव्वा उडवला होता. मात्र कॅलेडोनियाविरुद्धच्या विजयामुळे ३ गुण मिळवून होंडुरासने आपले आव्हान शाबूत ठेवले आहे. त्यांचा अखेरचा साखळी सामना १४ ऑक्टोबरला फ्रान्सविरुद्ध होणार आहे.

दक्षिण कोरियात २००७ मध्ये झालेल्या कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या होंडुरासने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला आहे.

इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवरील या सामन्यात मध्य अमेरिकेतील या संघाने पहिल्याच सत्रात नियंत्रण मिळवले. मग दुसऱ्या सत्रात आणखी दोन गोल केले. जोशुआ कॅनालिसच्या साहाय्यामुळे मेजियाने २५व्या मिनिटाल पहिला गोल केला. दोन मिनिटांनी कॅनालिसने दुसरा गोल केला. त्यानंतर सांतियागो कॅब्रेराच्या क्रॉसवर मेजियाने दुसरा गोल साकारला. दुसऱ्या सत्रात सहाव्या मिनिटाला पॅलाकियोसने हेडरद्वारे आपला पहिला गोल केला, तर ८८व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला.