13 December 2017

News Flash

आजच्या सामन्यावर आशेची धुगधुगी

कुमार विश्वचषकातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा

स्वदेश घाणेकर, नवी दिल्ली | Updated: October 12, 2017 3:12 AM

आत्मविश्वास उंचावलेल्या भारताला बलाढय़ घानाविरुद्ध कुमार विश्वचषकातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमचे नाव आता भारतीय फुटबॉलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. फुटबॉलची फारशी आवड नसलेल्या येथील क्रीडारसिकांवर भारताच्या कुमार संघाने मोहिनी घातली आहे. क्रिकेटव्यतिरिक्त दिल्लीकरांनी डोक्यावर घेतलेला हा पहिलाच खेळ असावा. याची प्रचीती कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या पहिल्या दोन लढतींत दिसून आली. आता अखेरच्या साखळी सामन्यात घानावर जोरदार हल्ला करीत पहिल्यावहिल्या विजयाची प्रतीक्षा संपवण्यासाठी भारतीय संघ आसुसला आहे.

मणिपूरच्या जॅक्सन थौनाओजामच्या ऐतिहासिक गोलचा दरवळ अजूनही भारतीय क्रीडारसिकांमध्ये कायम आहे. त्याच जोरावर यजमान भारत गुरुवारी माजी विजेत्या घानाविरुद्ध अविस्मरणीय कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. विश्वचषक स्पध्रेतील ‘अ’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात बाद फेरीसाठीची चुरस अनुभवण्याची संधी आहे. गेल्या दोन सामन्यांत प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळाचा मनमुराद आस्वाद घेतला. या खेळाडूंनी चाहत्यांना अंगावर शहारे आणणारे क्षण अनुभवायला दिले. अनेकांचे तर्क चुकवत भारताने स्पध्रेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रत्येक सामन्यागणिक हे खेळाडू अधिक प्रगल्भ झालेले पाहायला मिळाले आणि हा घानासाठी धोक्याचा इशारा आहे.

बचावपटू जॅक्सनकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यात कोलंबियाविरुद्ध पदार्पण करणाऱ्या नमित देशपांडे व संजीव स्टॅलिन यांनी बचावपटूची भूमिका चोख वठवून सर्वाचे लक्ष वेधले. कोमल थाटल, अमरजीत सिंग व अभिजित सरकार यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी आहे आणि त्यांना प्रामुख्याने घानाच्या सादिकइब्राहिमचे आक्रमण थोपवण्याचे आव्हान पेलावे लागेल. नजीब याकुबू, गिडेओन मेन्साह आणि रशिद अल्हासान या बचावपटूंचा भारताला धोका आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना चेंडूवरील नियंत्रणात्मक खेळ करावा लागेल. छोटे पास देत गोलचे लक्ष्य साधावे लागेल आणि प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मातोस यांनी हीच रणनीती आखली आहे.

घानाच्या अब्दुलची दुखापतीमुळे माघार

अमेरिकेविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झालेला घानाचा मध्यरक्षक अब्दुल युसूफ गुरुवारी होणाऱ्या लढतीत खेळणार नसल्याचे घाना फुटबॉल असोसिएशनने स्पष्ट केले. प्रतिस्पर्धी खेळाडूच्या धक्क्यामुळे अब्दुल मैदानावर बेशुद्ध झाला आणि त्याला त्वरित नवी दिल्लीतील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. आता तो शुद्धीत असून पूर्णपणे तंदुरुस्त झाला नसल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.

विजयासाठी आम्ही स्वत:ला झोकून देणार आहोत. मातबर संघांच्या तोडीस तोड खेळ करण्याची आणि त्यांच्याविरुद्ध विजय मिळवण्याची क्षमता आमच्यात असल्याचे जगाला दाखवायचे आहे. घानाविरुद्ध खेळताना आमच्यासमोर शारीरिक आणि मानसिक आव्हान असणार आहे. पण विजय मिळवण्यासाठी संपूर्ण सामन्यात क्षमतेपेक्षा दुप्पट खेळ करणार आहोत.  लुईस नॉर्टन डी मातोस, भारतीय संघाचे प्रशिक्षक

घाना मजबूत संघ आहे, परंतु त्यांचे आव्हान परतवून लावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्यांच्याविरोधात शारीरिक क्षमतेची कसोटी लागेल़, पण त्यासाठी तयारी केल्याचा मी पुनरुच्चार करतो. जॅक्सन थौनाओजाम

प्रतिस्पर्धी संघाचा आम्ही नेहमी आदर केला आहे, परंतु कोलंबिया संघापेक्षा अधिक कडवे आव्हान आम्ही घानाला देणार आहोत. हा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि पुढील फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी आहे.   अमरजीत सिंग, भारताचा कर्णधार

First Published on October 12, 2017 3:11 am

Web Title: live updates u 17 world cup football india vs ghana