कुमार विश्वचषक स्पर्धेतील ‘ब’ गटातून  उपउपांत्यपूर्व फेरीत कोणते दोन संघ प्रवेश करणार, याचे चित्र गुरुवारी स्पष्ट झाले. गतउपविजेत्या मालीने ३-१ अशा फरकाने न्यूझीलंडवर, तर पॅराग्वेने ३-१ अशा फरकाने टर्कीवर विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. सलग तीन विजयांसह पॅराग्वे ९ गुणांसह गटात अव्वल राहिला, तर माली सहा गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. न्यूझीलंडच्या खात्यात एकच गुण असून त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

पॅराग्वेने सातत्यपूर्ण कामगिरी करताना गुरुवारी टर्कीवर ३-१ अशी मात करून विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या लढतीत टर्कीने पहिली ४० मिनिटे पॅराग्वेचे आक्रमण अप्रतिमरीत्या थोपवले. मात्र ४१व्या मिनिटाला पॅराग्वेला ही बचावपटूंची व्यूहरचना भेदण्यात यश आले.

गियोवानी बोगाडोने पॅराग्वेसाठी पहिला गोल केला. अवघ्या दोन मिनिटांत फर्नाडो काडरेझोने त्यात भर घालत पॅराग्वेला पहिल्या सत्रात २-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतरचा खेळ फारच बचावात्मक झाला. दोन्ही संघांनी संयमी खेळ करत संधी निर्माण करण्याची वाट पाहिली. ६१व्या मिनिटाला पॅराग्वेला ती मिळाली आणि अँटोनियो गॅलिआनोने त्यावर गोल केला. ३-० अशा आघाडीनंतर पॅराग्वेचा विजय निश्चितच झाला होता. भरपाई वेळेत करिम केसगिनने गोल करून टर्कीचे खाते उघडले; पण पराभव टाळण्यासाठी हा प्रयत्न पुरेसा ठरला नाही. या पराभवासह टर्कीचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.