घरची परिस्थिती हलाखीची, वडिलांचे एक दुकान, पण कुटुंबातील दोन मुले आणि पत्नीला सांभाळता येईल इतके त्यांचे उत्पन्न नव्हते..अशा स्थितीत यशस्वी त्याचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला…मैदानातील ग्राऊंड्समनच्या तंबूत राहून आणि पोटाची खळगी भरण्यासाठी पाणीपुरी विकून तो दिवस ढकलत होता…तर दुसरीकडे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरुच होती.. अखेर १७ वर्षांच्या यशस्वी जयस्वालला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले असून भारताच्या अंडर १९ संघात त्याची निवड झाली आहे.

मूळचा उत्तर प्रदेशमधील भदोही गावचा रहिवासी असलेला यशस्वी जयस्वालची भारताच्या अंडर १९ संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे. यामुळे यशस्वी सध्या आनंदात आहे. मधल्या फळीतील फलंदाज म्हणून यशस्वी मैदानात उतरतो. हा दौरा यशस्वीसाठी महत्त्वाचा आहे. क्रिकेटच्या मैदानातील कारकिर्दीची ही त्याची सुरुवात असली तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास तितका सोपा नव्हता. त्याचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

यशस्वीच्या वडिलांचे भदोहीत एक छोटे दुकान आहे. यशस्वीला लहानपणापासूनच क्रिकेटपटू व्हायचे होते. त्याच्या वडिलांचा याला विरोध नव्हता. मात्र, आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यााठी यशस्वी मुंबईत आला. वरळीत त्याचे काका संतोष यांच्या घरी तो राहत होता. मात्र, ते घर छोटे असल्याने संतोष यांनी यशस्वीला मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांकडे नेले. त्याला तंबूत राहू द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.

मुंबईत आल्यानंतरच्या आठवणींबद्दल यशस्वी सांगतो, ‘काळबादेवीत एका डेअरीत मी राहत होतो. दिवसभर क्रिकेट खेळल्यानंतर मी थकायचो आणि डेअरीत गेल्यावर झोपायचो. मी काम करत नाही, फक्त झोपतो असे सांगत त्या डेअरीतून माझे सामान बाहेर फेकून देण्यात आले’.

यानंतर जवळपास तीन वर्ष यशस्वी एका तंबूत राहत होता. हा प्रकार भदोहीत वडिलांना कळणार याची दक्षताही तो घ्यायचा. कारण घरी हा प्रकार समजला तर त्याला मुंबई सोडून गावी परतावे लागले असते. त्याचे वडील कधी कधी पैसे पाठवायचे, पण ते पैसे यशस्वीसाठी पुरेसे नव्हते. मग आझाद मैदानात रामलीला दरम्यान पाणी पुरी आणि फळे विकून तो पैसे कमवायचा. कधी कधी ग्राऊंड्समनमधील वादामुळे तो उपाशी पोटी झोपून जायचा. ‘रामलीला दरम्यान माझी चांगली कमाई व्हायची. संघातील माझे सहकारी स्टॉलवर येऊ नये अशी मी प्रार्थना करायचो. कधी कधी ते यायचे आणि त्यांना पाणीपुरी देताना मला खूप वाईट वाटायचे’, असे यशस्वी सांगतो. वेळप्रसंगी मोठ्या वयोगटातील मुलांसोबत खेळून तो आठवड्याला २०० ते ३०० रुपयांची कमाई करायचा.

‘माझ्या टीममधील अनेकांचे पालक डबा घेऊन यायचे किंवा मुलांच्या बॅगमध्ये डबा तरी असायचा. पण माझ्यासाठी रोज स्वत:च स्वयंपाक करा आणि जेवा, हाच दिनक्रम होता. कधी कधी नाश्त्यासाठी देखील मला दुसऱ्याला विनंती करायला लागायची’, असे यशस्वी सांगतो.

मुंबईच्या अंडर १९ संघाचे प्रशिक्षक सतीश सामंत सांगतात, जयस्वालमध्ये मोठा क्रिकेटपटू होण्याची क्षमता आहे. तो परिस्थितीनुसार खेळतो आणि गोलंदाजाच्या मानसिकतेचा तो अचूक अंदाज घेतो. त्याच्याकडे स्मार्टफोन नाही. तो व्हॉट्स अॅपवरही नाही. सध्याच्या काळात हे दुर्मिळ चित्र आहे. त्याने खेळावर असेच लक्षकेंद्रीत ठेवले तर एक दिवस तो मुंबईचा स्टार क्रिकेटपटू असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्या जयस्वाल हा कदमवाडीतील एका चाळीत राहतो. त्याच्यासाठी ते महालच आहे. ‘तुम्ही मैदानातील मानसिक दबावाचे बोलताय. पण मी तर प्रत्यक्ष आयुष्यात यापेक्षा जास्त समस्यांना सामोरे गेलो आहे. यामुळे मी मानसिकदृष्ट्या आणखी सक्षम झालो’, असे यशस्वी सांगतो.