चॅम्पियन्स लीग फुटबॉल

पॅरिस : विक्रमी १३वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावणाऱ्या रेयाल माद्रिदवर यंदा या स्पर्धेत गटवार साखळीतच बाद व्हावे लागण्याची शक्यता आहे. याउलट लिव्हरपूल आणि पोटरे यांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे.

लिव्हरपूलने ‘ड’ गटात अयाक्सला १-० असे पराभूत केले. कुर्टिस जोन्सने ५८व्या मिनिटाला केलेला गोल लिव्हरपूलच्या विजयात मोलाचा ठरला. लिव्हरपूलने ‘ड’ गटात पाचपैकी चार लढती जिंकून अव्वल स्थान राखले आणि बाद फेरीही गाठली. रेयाल माद्रिदला पुन्हा एकदा श्ॉख्तर डॉनेस्कने २-० असे पराभूत केले. १० दिवसांपूर्वीदेखील या स्पर्धेत उभय संघांमध्ये झालेल्या लढतीत श्ॉख्तरने माद्रिदला नमवले होते. जर ही लढत रेयाल माद्रिदने जिंकली असती तर त्यांना आगेकूच करता आली असती. मात्र पराभवामुळे माद्रिदला ‘ब’ गटात तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. माद्रिदने याआधी सलग २४ वेळा या स्पर्धेची बाद फेरी गाठली आहे. मात्र या स्पर्धेत गेल्या पाच लढतींत ९ गोल प्रतिस्पध्र्याना करण्याची संधी माद्रिदने दिली आहे. डेन्टिनो (५७ वे मिनिट) आणि मनोर सोलोमन (८२ वे मिनिट) यांचे प्रत्येकी एक गोल श्ॉख्तरच्या विजयात मोलाचे ठरले. रेयाल माद्रिदचा हा चार दिवसांतील दुसरा पराभव ठरला. नुकतेच ला-लिगामध्ये रेयाल माद्रिदला अल्वेसकडून पराभूत व्हावे लागले आहे. या स्पर्धेत गटवार साखळीत माद्रिदची अखेरची लढत पुढील आठवडय़ात मॉँचेनग्लाडबाखविरुद्ध होणार आहे.

बायर्न म्युनिच आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत संपली. बायर्न म्युनिचने याआधीच ‘अ’ गटातून बाद फेरी गाठली आहे. अ‍ॅटलेटिकोकडून जाओ फेलिक्सने २६व्या मिनिटाला गोल केला होता. मात्र बरोबरी साधण्याची संधी बायर्नला ८६व्या मिनिटाला पेनल्टीवर मिळाली. त्यावर थॉमस म्युलेरने गोल केला.