सलाह, फर्मिनो यांचे प्रत्येकी दोन गोल; अखेरच्या दहा मिनिटांत पाहुण्यांचा पलटवार * दोन दूरच्या गोलमुळे रोमाच्या आशा कायम

चॅम्पियन्स लीग फुटबॉल

लंडन : इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सर्वोत्तम खेळाडू मोहम्मद सलाहला रोखणे इटालियन क्लब रोमालाही शक्य झाले नाही. दोन सुरेख गोल आणि दोन गोलसाठी साहाय्य करत सलाहाने लिव्हरपूलच्या विजयात पुन्हा एकदा सिंहाचा वाटा उचलला. मंगळवारी मध्य रात्री झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात लिव्हरपूलने ५-२ असा विजय मिळवला. रोबेटरे फर्मिनोनेही दोन गोल आणि दोन साहाय्य केले, तर सॅदियो मानेने एक गोल करून हातभार लावला. मात्र रोमाने अखेरच्या दहा मिनिटांत जोरदार पलटवार करून यजमानाच्या जल्लोषात चिंतेचे वातावरण निर्माण केले.

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लिव्हरपूलने जवळपास ५५ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेत्या बार्सिलोनाला अनपेक्षित पराभवाचा धक्का देणाऱ्या रोमाने पहिल्या पंधरा मिनिटांत उल्लेखनीय खेळ केला. सातत्याने आक्रमण करत त्यांनी लिव्हरपूलच्या बचावफळीला व्यग्र ठेवले. त्यांचा एक प्रयत्न तर गोलरक्षकाला चकवून गोलखांबाला लागल्याने मागे फिरला. या अनपेक्षित आक्रमणानंतर लिव्हरपूलने हळूहळू सामन्यावर पकड घेण्यास सुरुवात केली. लिव्हरपूलचा ओक्सलॅड-चेम्बरलेनला दुखापतीमुळे १९व्या मिनिटाला मैदान सोडावे लागले.

रोमाचे आक्रमण जितके प्रभावशाली होते, तितकाच त्यांच्या बचावात त्रुटी जाणवत होत्या आणि त्याचाच फायदा उचलत लिव्हरपूलने गोलसपाटा लावला. लिव्हरपूलचा सर्वात यशस्वी आक्रमणपटू मोहम्मद सलाहने पाहुण्यांच्या त्रुटीवर हल्ला चढवताना (३५ व ४५ मि.) दहा मिनिटांच्या अंतराने फर्मिनोच्या पासवर दोन गोल केले आणि क्लबला पहिल्या सत्रात २-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात सोपे गोल करण्यात अपयशी ठरलेल्या मानेने ५६व्या मिनिटाला गोल करत लिव्हरपूलची आघाडी वाढवली. सलाहने पास केलेल्या चेंडूवर मानेने हा गोल केला. अवघ्या पाच मिनिटांत सलाहाने पुन्हा एकदा गोलसाठी साहाय्य केले आणि या वेळेला फर्मिनोने गोल केला. ६८व्या मिनिटाने फर्मिनोने वैयक्तिक दुसरा गोल करून लिव्हरपूलची आघाडी ५-० अशी मजबूत केली. रोमाने मात्र अखेपर्यंत जिद्दीने खेळ करताना शेवटच्या दहा मिनिटांत दोन गोल केले. एडिन डीझेको आणि डिएगो पेरोट्टीने अनुक्रमे ८१ व ८५ व्या मिनिटाला गोल करत रोमाच्या अंतिम फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. रोमाच्या या दोन गोलमुळे लिव्हरपूलची चिंता किंचितशी वाढवली.

लिव्हरपूलच्या मैदानावरील दोन गोल आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि परतीचा सामना आमच्या मैदानावर आहे. फुटबॉलमध्ये काहीही घडू शकते, असे आम्हाला वाटते. या लढतीची बार्सिलोनाविरुद्धच्या सामन्याची तुलना होऊ शकत नाही.

– इयूसबीयो डी फ्रान्सेस्को, रोमाचे प्रशिक्षक