बर्लिन : बायर्न म्युनिकवर चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी जर्मनीच्या आशा असून बुधवारी पहाटे होणाऱ्या सामन्यात त्यांच्यासमोर बलाढय़ लिव्हरपूलचे आव्हान असणार आहे.

२००५-०६ मोसमानंतर जर्मनीच्या किमान एका संघाने अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे जरी पहिल्या फेरीच्या लढतीत बायर्नला मोठय़ा फरकाने पराभूत व्हावे लागले तरी १३ मार्च रोजी होणाऱ्या परतीच्या लढतीत बायर्नला दणदणीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करता येईल. ‘‘महत्त्वाच्या सामन्यात चुका करून चालणार नाही. लिव्हरपूल संघाला सध्या समस्यांनी घेरले आहे. त्याचा फायदा आम्हाला उठवता येईल. चांगली कामगिरी केली तरी आमच्या संघात आगेकूच करण्याची नक्कीच क्षमता आहे,’’ असे बायर्नचा मधल्या फळीतील खेळाडू जेम्स रॉड्रिगेझ याने सांगितले.

बुंडेसलीगा लीगमध्ये शुक्रवारी ऑग्सबर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात बायर्न म्युनिकने दोन वेळा पिछाडीवरून मुसंडी मारत ३-२ असा विजय साकारला. त्यामुळे बुधवारी पहाटे होणाऱ्या सामन्यात बायर्नचे पारडे जड मानले जात आहे. ऑग्सबर्गविरुद्ध ज्या संधी बायर्नला मिळाल्या, तशा संधी लिव्हरपूलसारख्या तगडय़ा संघाविरुद्ध मिळणार नाहीत, हे बायर्नचा कर्णधार मॅन्यूएल न्यूएर याने मान्य केले. तो म्हणतो, ‘‘लिव्हरपूल हा बलाढय़ आणि आक्रमक खेळ करणारा संघ आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अचूक खेळ करावा लागेल.’’

सामन्याची वेळ : बुधवारी पहाटे १.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी लिव्ह