उपउपांत्यपूर्व फेरीतील परतीच्या सामन्यात अ‍ॅटलेटिको माद्रिदकडून पराभूत

लिव्हरपूल : सांघिक कामगिरीच्या बळावर सातत्याने विजय मिळवणाऱ्या लिव्हरपूलला गुरुवारी रात्री झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पराभवाचा जबर धक्का बसला. मार्कस लॉरेंटने अतिरिक्त वेळेत केलेल्या दोन महत्त्वपूर्ण गोलच्या बळावर अ‍ॅटलेटिको माद्रिदने परतीच्या लढतीत गतविजेत्या लिव्हरपूलला त्यांच्याच चाहत्यांसमोर ३-२ (४-२) असे नमवून दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील लढतीत अ‍ॅटलेटिकोने १-० असा विजय मिळवला होता. त्यामुळे या लढतीतील आणखी तीन गोलसह अ‍ॅटलेटिकोने ४-२ अशा एकूण गोलफरकाने गेल्या सहा वर्षांत पाचव्यांदा उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.

लिव्हरपूल येथील अ‍ॅनफिल्ड स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात जॉर्जिआनो विनाल्डमने ४३व्या मिनिटाला लिव्हरपूलसाठी पहिला गोल केला. दोन्ही सत्रात मिळून हा एकच गोल झाल्याने सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला.

९४व्या मिनिटाला रॉबटरे फर्मिनोने लिव्हरपूलसाठी दुसरा गोल केल्यामुळे संपूर्ण स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. परंतु दिएगो कॉस्टाच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या २५ वर्षीय लॉरेंटने लिव्हरपूलच्या स्वप्नांना सुरुंग लावून अनुक्रमे ९७ आणि १०६व्या मिनिटाला दोन गोल नोंदवले.

सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जाणार अशी चिन्हे दिसत असतानाच अल्वारो मोराटाने १२०+१व्या मिनिटाला निर्णायक गोल साकारून अ‍ॅटलेटिकोच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि लिव्हरपूलचे आव्हान संपुष्टात आणले.

१४ तब्बल १४ वर्षांनी पहिल्यांदाच लिव्हरपूलला चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. यापूर्वी २००६ मध्येही त्यांना उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नव्हती.

चॅम्पियन्स लीगमध्ये बदली खेळाडू म्हणून मैदानावर येत दोन गोल करणारा मार्कस लॉरेंट हा अ‍ॅटलेटिकोचा दुसरा खेळाडू ठरला. २००९ मध्ये सर्जिओ अ‍ॅग्युरोने चेल्सीविरुद्ध दोन गोल नोंदवून संघाला विजयी केले होते.