जगविख्यात आक्रमक मोहम्मद सलाहने पूर्वार्धात लगावलेला गोल आणि गोलरक्षक अ‍ॅलिसन बेकरने केलेल्या अफलातून बचावांमुळे लिव्हरपूलला नेपोलीवर १-० अशी मात करीत चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यात यश मिळाले. मध्यंतराला ११ मिनिटे बाकी असताना सलाहने मिळवून दिलेली आघाडीच सामन्यात निर्णायक ठरली. त्यानंतर उत्तरार्धात नेपोलीकडून आलेल्या सर्व आक्रमणांना रोखत अ‍ॅलिसनने आघाडी कायम राखल्याने लिव्हरपूलला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम १६ संघांमध्ये स्थान मिळवण्यात यश आले.

इंटर मिलान बाहेर

मिलानच्या सॅन सिरो येथे झालेल्या सामन्यात इंटर मिलानला पीएसव्ही इन्डहोवेनने १-१ असे बरोबरीत रोखले, तर ब-गटातील प्रतिस्पर्धी टॉटनहॅम हॉटस्परने बार्सिलोनावर मात केल्याने इंटर मिलान चॅम्पियन्स लीगमधून बाहेर फेकला गेला आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये राहण्यासाठी इंटर मिलानची कामगिरी टॉटनहॅम हॉटस्परपेक्षा चांगली होणे आवश्यक होते. मात्र, या निकालांमुळे त्यांची वाटचाल खंडित झाली आहे.