जेतेपदासाठी रेयाल माद्रिदचे आव्हान; ऐतिहासिक भरारीचा रोमाचा प्रयत्न अयशस्वी

लिव्हरपूल आणि रेयाल माद्रिद क्लब १९८१ नंतर चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदासाठी प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. लिव्हरपूलला उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील लढतीत पराभव पत्करावा लागला असला तरी रोमा क्लबला त्यांनी गोल सरासरीच्या शर्यतीत मोठय़ा चतुराईने आघाडी घेण्यापासून रोखले. रोमा क्लबने ४-२ अशा फरकाने हा परतीचा सामना जिंकला, परंतु गोल सरासरीत ते ६-७ असे पिछाडीवर पडले. या एकमेव गोलच्या आघाडीच्या जोरावर लिव्हरपूलने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.

उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात लिव्हरपूलने ५-२ असा दणदणीत विजय मिळवला होता, परंतु रोमाने प्रतिस्पर्धी मैदानावर दोन गोल करताना अंतिम फेरीच्या आशा कायम राखल्या होत्या. रोमाचे हे दोन गोल डोकेदुखी ठरू शकतात, याची जाण लिव्हरपूलला होती आणि म्हणूनच प्रथम ती पिछाडी भरून काढण्यावर भर दिला. रोमाने घरच्या प्रेक्षकांसमोर आक्रमणावर भर दिला. सुरुवातीपासूनच त्यांची आक्रमणाची धार तीव्र करताना लिव्हरपूलची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र या आक्रमणात त्यांच्याकडून बचावात राहिलेल्या त्रुटींचा लिव्हरपूलने फायदा उचलला. ९व्या मिनिटाला सॅडीयो मानेने सुरेख गोल केला, तर जॉर्जिनियो विज्नाल्डमने तीन वर्षांनंतर पहिल्या गोलची नोंद करताना लिव्हरपूलचे दोन गोलचे लक्ष्य पूर्ण करून दिले. १५व्या मिनिटाला जेम्स मिलनरकडून दुर्दैवाने झालेल्या स्वयंगोलने रोमाचे खाते उघडले.

अंतिम फेरीतील प्रवेशासाठी रोमाला ६-२च्या फरकाने विजय मिळवणे अनिवार्य होते. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी असाच अशक्य वाटणारा विजय मिळवून बार्सिलोनाला स्पध्रेबाहेर केले होते. त्यामुळे मध्यंतरानंतर त्यांनी चार गोल करण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र त्यांना केवळ तीन गोल करता आले आणि त्यापैकी दोन गोल अखेरच्या आठ मिनिटांत केले. इडिन डेको (५२ मि.), रॅडजा नैनगोलन (८६ व ९०+४ मि.) यांनी रोमाचे स्पध्रेतील आव्हान कायम राखण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले. १९८४च्या जेतेपदाच्या लढतीतही लिव्हरपूलने यजमान रोमाचा पराभव केला होता आणि त्याची पुनरावृत्ती गुरुवारी झाली.

०८ : लिव्हरपूलने आठव्यांदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून, २००७ नंतर जेतेपदासाठीची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. इंग्लिश क्लबमध्ये सर्वाधिक चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मान लिव्हरपूलला जातो.