उपांत्यपूर्व फेरीत एफसी पोटरेवर ६-१च्या एकूण गोलफरकाने मात

एएफपी, पोटरे (पोर्तुगाल)

अव्वल तीन आघाडीवीरांनी केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात एफसी पोटरेचा ४-१ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पहिल्या सामन्यात २-० असा विजय मिळवणाऱ्या लिव्हरपूलने ६-१ अशा एकूण गोलफरकाने अंतिम चार जणांमध्ये स्थान मिळवले असून त्यांना आता बलाढय़ बार्सिलोनाशी झुंज द्यावी लागेल.

इस्टाडियो डो ड्रॅगाओ येथे रंगलेल्या सामन्यात, सॅडियो माने याने २६व्या मिनिटालाच गोल करत लिव्हरपूलला आघाडी मिळवून दिली. ‘व्हीएआर’ (व्हिडीओ असिस्टंट रेफरी) पद्धतीनुसार बराच वेळ चर्वितचर्वण केल्यानंतर लिव्हरपूलला हा गोल देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात मोहम्मद सलाह (६५व्या मिनिटाला), रॉबेटरे फिर्मिनो (७७व्या मिनिटाला) आणि विर्जिल व्ॉन डिक (८४व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे लिव्हरपूलने पोटरेचे आव्हान संपुष्टात आणले. सामना संपायला २१ मिनिटांचा अवधी शिल्लक असताना इडेर मिलिटाओने पोटरेसाठी गोल झळकावला, मात्र तोपर्यंत लिव्हरपूलने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले होते.

आता लिव्हरपूला २००६-०७ मोसमानंतर पहिल्यांदाच लिओनेल मेसीच्या बार्सिलोनाशी लढत द्यावी लागेल. त्या वेळी अंतिम १६ जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी झालेल्या सामन्यात लिव्हरपूलने प्रतिस्पध्र्याच्या मैदानावर केलेल्या गोलमुळे विजय मिळवला होता. या विजयामुळे चॅम्पियन्स लीग आणि इंग्लिश प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावण्याच्या लिव्हरपूलच्या आशा उंचावल्या आहेत. लिव्हरपूलचा हा सलग आठवा विजय ठरला असून गेल्या १७ सामन्यांत त्यांना एकदाही पराभवाचा सामना करावा लागला नाही.

‘‘या मोसमात आम्ही दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले असले तरी यापुढचा प्रवास खडतर असणार आहे. दुसऱ्या सत्रात पोटरेच्या खेळाडूंची ऊर्जा कमी पडल्यामुळे आम्हाला सामन्यावर नियंत्रण मिळवता आले. दुसऱ्या सत्रात केलेल्या तीन गोलमुळेच आम्हाला मोठय़ा फरकाने विजय साकारता आला. आता बार्सिलोनाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चमकदार कामगिरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’’ असे लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गेन क्लोप यांनी सांगितले.