बार्सिलोनाच्या विजयात प्रतिस्पर्धी खेळाडूंचा हातभार

लिव्हरपूल आणि मँचेस्टर सिटी या इंग्लिश प्रीमिअर लीगमधील दोन बलाढय़ क्लबमध्ये लिव्हरपूलने वर्चस्व गाजवले. चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील लढतीत लिव्हरपूलने ३-० अशा फरकाने सहज विजय मिळवला, तर कॅम्प न्यू येथे झालेल्या लढतीत बार्सिलोनाने दोन स्वयंगोलमुळे पाहुण्या रोमा क्लबवर ४-१ असा विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली.

लिव्हरपूल आणि मँचेस्टर सिटी यांच्या लढतीच्या उत्सुकतेने अ‍ॅनफिल्ड स्टेडियमवर ५१ हजारांपर्यंत प्रेक्षकसंख्या होती. त्यात घरच्या मैदानावर होत असलेल्या या लढतीमुळे लिव्हरपूलचे पारडे जड होते. मोहमद सलाहने १२व्या मिनिटाला रोबटरे फर्मिनोच्या पासवर गोल करत लिव्हरपूलचे खाते उघडले. सलाहचा चॅम्पियन्स लीगमधील नऊ सामन्यांतील हा सातवा गोल ठरला. यंदाच्या हंगामात सर्व प्रकारच्या स्पर्धामध्ये सलाहने एकूण ३८ गोल केले आहेत आणि या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो ३९ गोलसह आघाडीवर आहे. सलाहच्या या गोलनंतर लिव्हरपूलने आक्रमणाची धार अधिक तीव्र करताना पहिल्या सत्रात दोन गोलची भर घातली. ए.  ऑक्सलेड-कॅम्बर्लेन (२० मि.) आणि सॅडीओ मॅन (३१ मि.) यांनी गोल करत मध्यंतरापर्यंत लिव्हरपूलची आघाडी ३-० अशी भक्कम केली. दुसऱ्या सत्रात लिव्हरपूलने अधिक बचावात्मक खेळ करत ही आघाडी कायम राखून विजयावर शिक्कामोर्तब केले.

कॅम्प न्यू येथे झालेल्या दुसऱ्या लढतीत यजमान बार्सिलोनाच्या विजयाचा पाया प्रतिस्पर्धी रोमा क्लबच्या खेळाडूंनी रचला. सातत्याने गोल करण्याचे प्रयत्न करूनही बार्सिलोनाच्या मार्गात रोमाचा गोलरक्षक अ‍ॅलिसन बेकर अभेद्य भिंतीसारखा उभा होता. मात्र त्याच्या प्रयत्नांना सहकाऱ्यांची योग्य साथ लाभली नाही. डॅनिएल डी रोसी आणि कोस्टास मॅनोलास यांच्या अनुक्रमे ३८ व ५५व्या मिनिटाच्या स्वयंगोलने बार्सिलोनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. रोमाच्या बचावफळीत बऱ्याच उणिवा जाणवल्या, परंतु अ‍ॅलिसन आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर त्या झाकून घेत होता. त्याने लिओनेल मेसी, लुईस सुआरेझ या अव्वल खेळाडूंचे आक्रमण अचूक थोपवले होते. मात्र दोन स्वयंगोलमुळे त्याचेही मनोबल खचले. यंदाच्या चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोनाला आत्तापर्यंत पाच स्वयंगोलचा फायदा मिळाला आहे आणि हा एक विक्रम आहे. चॅम्पियन्स लीगच्या इतिहासात एकाच सामन्यात दोन स्वयंगोल करणारा रोमा हा पाचवा क्लब आहे. गेरार्ड पिक्यूने ५९व्या मिनिटाला बार्सिलोनाच्या गोलखात्यात भर घातली. ८०व्या मिनिटाला ई. डॅझेकोच्या गोलने रोमाच्या खेळाडूंचा मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला, परंतु अवघ्या सात मिनिटांत सुआरेझने अप्रतिम गोल करत बार्सिलोनाच्या विजयावर ४-१ असे शिक्कामोर्तब केले. १०५८ मिनिटांनंतर सुआरेझला चॅम्पियन्स लीगमध्ये पहिल्या गोलची नोंद करता आली.