उपांत्य फेरीतील डॅनियल स्टुरीजच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर युरोपा फुटबॉल लीगमध्ये लिव्हरपूलने व्हिलारियलवर ३-० असा विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात लिव्हरपूलसमोर सेव्हिलाचे आव्हान असेल. अन्य एका उपांत्य फेरीच्या सामन्यात सेव्हिलाने शाखतर डोनेक्स संघावर ३-१ असा विजय मिळवला.

लिव्हरपूलच्या सामन्याची सुरुवातच नाटय़मयरीत्या झाली. सामन्याच्या सातव्या मिनिटाला लिव्हरपूलचा स्टुरीज गोल करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. त्याने मारलेला फटका व्हिलारियल ब्रुनो सोनियारोला लागला आणि चेंडू गोलजाळ्यात गेला, त्यामुळे सामन्याच्या सातव्याच मिनिटाला व्हिलारियलवर स्वयंगोलाचा भरुदड पडला. या गोलच्या जोरावर लिव्हरपूलच्या संघाने मध्यंतरापर्यंत १-० अशी आघाडी कामय राखली होती. त्यानंतर सामन्याच्या ६३व्या मिनिटाला स्टुरीजने गोल करत संघाची आघाडी २-० अशी वाढवली. सामन्याच्या ८१व्या मिनिटाला स्टुरीजच्या मदतीने अ‍ॅडम लल्लानाने गोल केला. या सामन्यापूर्वी लिव्हरपूलचा संघ १-० अशा पिछाडीवर होता. त्यामुळे या सामन्यात तीन गोल करत लिव्हरपूलने ३-१ अशी आघाडी मिळवत अंतिम फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला.

सेव्हिलाच्या विजयात गॅमेइरोने मोलाचा वाटा उचलला. केव्हिन गॅमेइरोने सामन्याच्या नवव्या आणि ४७व्या मिनिटाला गोल करत संघाला विजयासमीप नेले. त्यानंतर सेव्हियाच्या फेरेइरा फेल्होने सामन्याच्या ५९व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शाखतर डोनेक्स संघाकडून एडय़ुअरोने सामन्याच्या ४४व्या मिनिटाला एकमेव गोल केला. यापूर्वी झालेला दोन्ही संघांमधील सामना २-२ अशा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे या सामन्यानंतर सेव्हिलाने एकूण ५-३ अशी आघाडी मिळवत अंतिम फेरी गाठली.