जॉर्डन इबेचा निर्णायक गोल * रुबिन कझानचा पराभव
जॉर्डन इबेच्या निर्णायक गोलच्या जोरावर लिव्हरपूलने युरोपा लीगमध्ये रुबिन कझानवर १-० असा विजय साजरा केला. नवीन प्रशिक्षक जुर्गेन क्लोप यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना लिव्हरपूलचा हा सलग तिसरा विजय ठरला. याआधी लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये चेल्सीचा, तर कॅपिटल वन चषक स्पध्रेत एएफसी बोर्नेमाउथचा पराभव केला होता. कझानवरील विजयाने लिव्हरपूलचे युरोपा लीगच्या पुढील फेरीच्या आशा कायम राहिल्या आहेत.
‘ब’ गटाच्या या लढतीसाठी लिव्हरपूल क्लबचा संघ जवळपास ३००० किलोमीटरचा प्रवास करून येथे दाखल झाला होता. युरोपा स्पध्रेतील गेल्या तीन सामन्यांत बरोबरीवर समाधान मानावे लागल्यामुळे या परतीच्या लढतीत क्लोप यांना विजयाची अपेक्षा होती. मात्र, त्यांच्यासमोर यजमान कझानने कडवे आव्हान उभे केले. कझानचा गोलरक्षक सेर्गेई रिझीकोव्हने पाहुण्यांसमोर अभेद्य भिंत उभी केली होती. पाहुण्यांनी संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवले.
५२व्या मिनिटाला लिव्हरपूलने रिझीकोव्हची भिंत भेदली. रॉबेटरे फिरमिनोच्या पासवर जॉर्डनने सहज गोल करून लिव्हरपूलचे खाते उघडले. त्यानंतर लिव्हरपूलचे आक्रमण अधिक वाढले आणि ५८व्या मिनिटाला जॉर्डनला गोल करण्याची दुसरी संधी मिळाली. उजव्या कॉर्नरवरून लोव्हरेनने टोलावलेला चेंडू हेडरद्वारे गोलजाळीत पोहोचवण्यासाठी जॉर्डन पुढे सरसावला, परंतु रिझीकोव्हने चेंडू अचूक अडवला. त्यानंतर लिव्हरपूलने बचावात्मक खेळ करताना अखेपर्यंत १-० अशी आघाडी कायम राखून विजय निश्चित केला.