चॅम्पियन्स लीग फुटबॉल

जॉर्गिन्होने पेनल्टीवर नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या लढतीत आयक्सला ४-४ अशा बरोबरीत रोखले. तर बलाढय़ बार्सिलोनाला स्लॅव्हिया प्रहाविरुद्धच्या लढतीत गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. गतविजेत्या लिव्हरपूलने गेन्क संघावर २-१ असा विजय मिळवला.

अ‍ॅनफिल्ड स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात जिऑर्जिनो विज्नाल्डमने १४व्या मिनिटाला गोल करत लिव्हरपूलला आघाडीवर आणले. त्यानंतर मवाना समाटा याने ४०व्या मिनिटाला गेन्कला बरोबरी साधून दिली. पण दुसऱ्या सत्रात अ‍ॅलेक्स ओक्साल्डे-चेंबरलेन याने केलेला गोल लिव्हरपूलच्या विजयात निर्णायक ठरला. या आठवडय़ात मँचेस्टर सिटीविरुद्ध होणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्याकरिता लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गेन क्लोप यांनी काही महत्त्वपूर्ण खेळाडूंना विश्रांती दिली होती.

जॉर्गिन्होने दुसऱ्या आणि ७१व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत चेल्सीला आघाडीवर आणले. त्यातच सेसार अझिलीक्यूएटा (६३व्या मिनिटाला) आणि रीस जेम्स (७४व्या मिनिटाला) यांनीही चेल्सीसाठी गोल नोंदवले. आयएक्सला टॅमी अब्राहम (दुसऱ्या मिनिटाला) आणि केपी अरीझाबालागा (३५व्या मिनिटाला) यांच्या स्वयंगोलमुळे दोन गोलचा बोनस मिळाला. त्यानंतर क्विनी प्रोम्स (२०व्या मिनिटाला) आणि डॉनी व्हॅन डे बीक (५५व्या मिनिटाला) यांनी गोल करत चेल्सीविरुद्धचा सामना ४-४ असा बरोबरीत सोडवला.

अन्य सामन्यांत, अच्राफ हाकिमीने ५१व्या आणि ७७व्या मिनिटाला अनुक्रमे दोन गोल करून बोरुसिया डॉर्टमंडला इंटर मिलानविरुद्ध २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर ज्यूलियन ब्रँडट्ने ६४व्या मिनिटाला केलेला गोल डॉर्टमंडच्या विजयात मोलाचा ठरला.