नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) जैव-सुरक्षित वातावरणात राहणे मानसिकदृष्टय़ा खडतर होते. मात्र स्पर्धेच्या यशासाठी खेळाडूंनी दाखवलेला पाठिंबा याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याने आभार मानले आहेत.

‘‘बीसीसीआयचा पदाधिकारी तसेच आयपीएलमधील प्रत्येक संघातील सर्व खेळाडूंचे मी आभार मानतो. या स्पर्धेच्या यशासाठी जैव-सुरक्षित वातावरणात राहणे कठीण होते. पण मानसिकदृष्टय़ा सर्व आव्हाने पेलत, भारतीय क्रिकेटपती असलेल्या तुमच्या बांधीलकीला सलाम,’’ असे गांगुलीने म्हटले आहे.

‘आयपीएल’चे १३वे पर्व मार्चअखेरीसपासून सुरू होणार होते. पण करोनामुळे ही स्पर्धा अखेर संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आली. दुबई, शारजा आणि अबू धाबी या तीन ठिकाणी जैव-सुरक्षित वातावरणात खेळाडूंचे वास्तव्य होते. ‘बीसीसीआय’चे खजिनदार अरुण धुमाळ यांनीही गांगुलीच्या मताशी सहमती दर्शवत जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग पुढील वर्षी मोठय़ा दिमाखात आयोजित केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.