वेस्ट इंडिजच्या विश्वचषकाच्या संघात अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो आणि किरॉन पोलार्ड यांचे नाव न दिसल्यामुळे क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का बसला, काही जणांना हा निर्णय पचनी पडलाच नाही. पण निवड समिती अध्यक्ष आणि माजी विश्विजेते कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांनी या निर्णयाचे समर्थन केले असून या दोघांची लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्यामुळेच वगळल्याचे स्पष्ट केले.
‘‘या दोन्ही खेळाडूंना वगळण्याचा निर्णय सोपा नक्कीच नव्हता. कारण हे दोघेही नावलौकिक मिळवलेले खेळाडू होते. पण गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी ही अपेक्षेप्रमाणे नक्कीच झाली नव्हती. या दोघांना वगळण्याचा निर्णय घेताना दीर्घ काळ चर्चा झाली, पण अखेर या निर्णयावर एकमत झाले. भविष्याच्या दृष्टीने संघ अधिक बलवान करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे,’’ असे लॉइड म्हणाले.
विश्वचषकासाठी संभाव्य संघ जाहीर केल्यानंतर ब्राव्हो आणि पोलार्ड यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले होते. हा निवड समितीने दिलेला पहिला सूचक इशारा होता. या दोन्ही खेळाडूंना वगळल्यावर माजी क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग यांनी निवड समितीवर तोफ डागली होती. होल्डिंग यांनी आयसीसीच्या सर्वोत्तम एकदिवसीय संघात हे दोन्ही खेळाडू असूनही विश्वचषकाच्या संघात नसल्याचे पाहून निवड समितीला धारेवर धरले होते. गेलने तर हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले होते.
याबाबत लॉइड म्हणाले की, ‘‘या दोन्ही खेळाडूंशी मी चर्चा केली असून त्यांना परिस्थिती सांगितली आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत कोणताही निषेध नोंदवलेला नाही. गेलच्या टीकेच्या बाबतीत म्हणाल, तर गेल काही निवड समितीमध्ये नाही, त्यामुळे त्याच्या टीकेचा निवड समितीवर परिणाम नक्कीच होणार नाही.’’