इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी मुकलेल्या सलामवीर लोकेश राहुलने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. इंग्लंड विरुद्ध विशाखापट्टणमच्या मैदानाl रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटीमध्ये राहुल लोकेशची संघात निवड झाली आहे. विशाखापट्चणमच्या मैदानावर १७ नोव्हेबर पासून भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुल मैदानात उतरण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची माहिती भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव अजय शिर्के यांनी दिली.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या नव्या कसोटीमध्ये लोकेश पास झाला आहे. दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्यानंतर पुनरागमनासाठी खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये फिटनेस सिद्ध केला तरच त्यांना संघात स्थान मिळेल, अशी नियमावली अनिल कुंबळेंनी जाहीर केली आहे. लोकेश राहुलने प्रशिक्षकांनी केलेल्या नियमावलीचे पालन करत देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात पुनरागमन केले. पायाच्या स्नायूमध्ये झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर लोकेशने रणजीच्या मैदानात उत्तम खेळी करुन आपण मैदानात खेळण्यास तंदुरुस्त असल्याचे सिद्ध केले. रणजी स्पर्धेमध्ये लोकेश राहुलने कर्नाटककडून मैदानात उतरत दुखापतीतून सावरल्याचे दाखवून दिले. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात ८५ चेंडूत ७७ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात १३२ चेंडूचा सामना करत १०६ धावांची दमदार खेळी केली.

राहुल लोकेशची भारतीय संघात वर्णी लागल्यामुळे भारतीय फलंदाजी मजबूत होईल. पण चार वर्षानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन झालेल्या गौतम गंभीरला अंतिम ११ खेळाडूमध्ये स्थान मिळविणे अवघड होऊ शकते. पहिल्या कसोटीमध्ये गौतम गंभीर पूर्णपणे अपयशी ठरला आहे. राजकोटच्या मैदानात पहिल्या कसोटीत गंभीरला केवळ २९ धावा करता आल्या होत्या. राजकोटमध्ये पहिल्या डावात २९ धावा करणाऱ्या गंभीरला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नव्हते.