झारखंड आणि ओडिशाविरुद्ध विजयापासून वंचित राहावे लागलेल्या मुंबईने कर्नाटकला पहिल्या दिवसअखेर २२८ धावांवर रोखले. युवा क्रिकेटपटू लोकेश राहुलने हंगामातील तिसऱ्या शतकाची नोंद करत कर्नाटकला सुस्थितीत नेले.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सौरभ नेत्रावळकरने रवीकुमार समर्थला झटपट माघारी धाडत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. यानंतर लोकेश राहुलने करुण नायरच्या साथीने डाव सावरला. विशाल दाभोळकरने नायरला बाद करत ही जोडी फोडली. जबरदस्त फॉर्मात असलेला मनीष पांडे शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. चिदंबरम गौतमला शून्यावरच बाद करत शार्दुलने कर्नाटकला अडचणीत टाकले. ४ बाद ८४ अशा स्थितीत सापडलेल्या कर्नाटकला आधार दिला तो लोकेशने. त्याने पाचव्या विकेटसाठी स्टुअर्ट बिन्नीसह ८२ धावांची भागीदारी केली. जावेद खानने बिन्नीला सिद्धेश लाडकडे झेल देण्यास भाग पाडले. श्रेयस गोपाळला हाताशी धरत लोकेशने ३२ धावांची भागीदारी केली. लोकेशने आपले शतक साकारल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेला कर्नाटकचा कर्णधार विनय कुमार ५ धावा करून तंबूत परतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्नाटकच्या ७ बाद २२८ धावा झाल्या आहेत. लोकेश राहुल १२० तर अभिमन्यू मिथुन ७ धावांवर खेळत आहेत.

संक्षिप्त धावफलक :  
कर्नाटक (पहिला डाव) : ७ बाद २२८ (लोकेश राहुल खेळत आहे १२०, स्टुअर्ट बिन्नी ३८, शार्दुल ठाकूर २/४९, विशाल दाभोळकर २/७५)