|| तुषार वैती

आठवडय़ाची मुलाखत : भक्ती कुलकर्णी राष्ट्रीय विजेती बुद्धिबळपटू

सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर आता जगज्जेती आणि ग्रँडमास्टर बनण्याची माझी इच्छा आहे, असे मत आंतरराष्ट्रीय महिला बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिने व्यक्त केले. एअर इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोव्याच्या भक्तीने काही दिवसांपूर्वीच दीड गुणांच्या फरकाने बाजी मारत सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय विजेती होण्याचा मान पटकावला. २०१६ मध्ये आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या भक्तीने जागतिक क्रमवारीतही ३८व्या स्थानी झेप घेतली आहे. राष्ट्रीय विजेतेपदाविषयी आणि तिच्या आगामी आव्हानांविषयी भक्तीशी केलेली खास बातचीत-

  • सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय विजेतेपद पटकावल्यानंतर काय भावना आहेत?

खरे तर मी सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय विजेती ठरली आहे. २०१७ मध्ये राष्ट्रीय ‘ब’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर माझी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. पण अधिकृतपणे सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय विजेतेपद पटकावल्याचा खूप आनंद झाला आहे. या वर्षी खूपच तगडी स्पर्धा होती. सौम्या स्वामिनाथन आणि दिव्या देशमुख या महाराष्ट्राच्या बलाढय़ खेळाडू चांगला खेळ करत होत्या. गेल्या वर्षी तिघी जणी अखेपर्यंत जेतेपदाच्या शर्यतीत होत्या, पण या वेळी मी १०व्या फेरीतच विजेतेपदावर मोहोर उमटवली होती.

  • अनेक चांगल्या खेळाडूंमुळे महिला बुद्धिबळातील स्पर्धा तीव्र होऊ लागली आहे. याबद्दल काय सांगशील?

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने राष्ट्रीय बक्षिसांच्या रकमेत वाढ केल्यामुळे महिला बुद्धिबळात अनेक मुली पुढे येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर महासंघ आणि क्रीडा मंत्रालयाच्या पुढाकारामुळे १५ आणि १७ वर्षांखालील तसेच खुल्या गटातील अव्वल सहा महिला बुद्धिबळपटूंना वर्षांला दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चमक दाखवण्याची संधी मिळू लागली आहे. त्यामुळे महिला बुद्धिबळपटूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खेळाडूंना नोकरीची संधी उपलब्ध झाली तर अनेक महिला बुद्धिबळपटू पुढे येतील. राष्ट्रीय विजेतेपदे, आशियाई आणि राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक जिंकूनही मी अद्याप नोकरीच्या प्रतीक्षेत आहे.

  • जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत तू अव्वल ५० जणींमध्ये झेप घेतलीस, यापुढची वाटचाल कशी असेल?

गेल्या महिन्यातच मी क्रमवारीत ७५व्या स्थानी होती. पण राष्ट्रीय विजेतेपदामुळे मी ३८व्या क्रमांकावर मजल मारली. यामुळे खूपच आनंद होत असून अद्याप मला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी भरपूर मेहनत घेण्याची माझी तयारी आहे. राष्ट्रीय विजेतेपदामुळे माझी महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. माझ्याकडून अपेक्षा वाढू लागल्या असून या स्पर्धेच्या तयारीसाठी मी काही सराव स्पर्धामध्ये खेळणार आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात होणाऱ्या जागतिक जलद आणि ब्लिट्झ प्रकारातील स्पर्धेसाठी माझी कसून तयारी सुरू आहे.

  • दोन-तीन वर्षांपूर्वी तुला क्रमवारीसाठी झटावे लागत होते, त्यावर तू कशी मात केलीस?

२०१४ मध्ये राष्ट्रकुल विजेतेपद आणि २०१६ मध्ये आशियाई बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवूनही माझ्या क्रमवारीत फारशी सुधारणा होत नव्हती. त्यामुळे माझा आत्मविश्वास काहीसा कमी होत चालला होता. परंतु माझे प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांच्या मार्गदर्शनानंतर माझ्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. विविध प्रकारे डावाची सुरुवात कशी करायची तसेच डावाच्या मध्यात प्रतिस्पध्र्याला कसे उत्तर द्यायचे, याबाबतच्या काही त्रुटींवर मात करत मी खेळ सुधारला. त्याचे लगेच फळ मला राष्ट्रीय विजेतेपदाद्वारे मिळाले.

  • यापुढे तुझे ध्येय काय आहे?

माझे आईवडील, प्रशिक्षक गोखले, त्यांच्या पत्नी अनुपमा तसेच श्रीनिवास डेम्पो यांचा माझ्या यशात मोलाचा वाटा आहे. या सर्वाच्या मार्गदर्शनामुळे सध्या मी २४०० एलो रेटिंगचा टप्पा पार केला असून ग्रँडमास्टर किताबासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महत्त्वाच्या स्पर्धामध्ये खेळून रेटिंग गुण वाढवावे लागतील. राष्ट्रीय विजेतेपदामुळे चीनमध्ये होणाऱ्या जलद आणि क्लासिकल प्रकाराच्या स्पर्धासाठी माझी निवड झाली आहे. त्याचबरोबर जगज्जेतेपद पटकावण्याची माझी इच्छा आहे.