|| सुप्रिया दाबके, लोकसत्ता

भारतात क्रिकेटच्या धर्तीवर तिरंदाजीचे महत्त्व वाढवण्याचे ध्येय एक तिरंदाज आणि संघटनेचा पदाधिकारी म्हणून मी ठेवले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय तिरंदाजी संघटनेचे सरचिटणीस प्रमोद चांदूरकर यांनी व्यक्त केली.
भारतीय तिरंदाजी संघटनेला (एएआय) आठ वर्षांनंतर नुकतीच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळाली. टोक्यो ऑलिम्पिकला काही महिने बाकी असताना मिळालेली ही मान्यता, करोनाकाळातील आव्हाने, खेळाडूंची तयारी या विविध विषयांवर चांदूरकर यांच्याशी केलेली खास बातचीत-

’ तिरंदाजी संघटनेला आठ वर्षांनंतर मान्यता मिळाली आहे. या लढय़ाबाबत काय सांगाल?

मागील आठ वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय असा मोठा संघर्ष आम्हाला करावा लागला आहे. २०११च्या राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या नियमांचे पालन न केल्याने संघटनेची मान्यता काढून घेण्यात आली होती. त्या वेळचे संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा हे ७० वर्षांवरील असल्याने संघटनेकडून वयाच्या अटींचे नियम मोडले गेले. मात्र या सर्वातून मार्ग काढत आणि क्रीडा धोरणाप्रमाणे यंदा निवडणुका घेत पुन्हा मान्यता मिळवली. खेळाची प्रगती होण्यासाठी ही मान्यता फार महत्त्वाची आहे.

’ संघटनेला मान्यता टोक्यो ऑलिम्पिकपूर्वी मिळाली आहे, याविषयी काय प्रतिक्रिया?

टोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष लांबणीवर पडले, ही तिरंदाजांच्या दृष्टीने चांगली संधी आहे. या संधीचा फायदा करण्यासाठी तिरंदाजी संघटनेसह आमचे ऑलिम्पिकसाठी सज्ज होणारे खेळाडू तयारीला लागले आहेत. आमचा मुलांचा संघ ऑलिम्पिकला याआधीच पात्र ठरला आहे. मुलींमधून दीपिका कुमारी ऑलिम्पिकला पात्र ठरली आहे. आगामी काळातील विश्वचषक स्पर्धेत जर भारतीय महिला संघाची पदकविजेती कामगिरी झाली तर मुलांप्रमाणेच मुलींचाही संघ ऑलिम्पिकला पात्र ठरेल. सध्या पुण्यात ऑलिम्पिकसाठी खेळाडूंची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी स्वतंत्र कार्यक्रमाची रूपरेषाच आम्ही आखली आहे.

’ भारतात तिरंदाजी खेळाचे महत्त्व वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखण्यात येत आहेत?

तिरंदाजी हा खेळ जास्त करून आदिवासी भागामध्ये सर्वाधिक प्रचलित आहे. भारताचे बरेचसे आंतरराष्ट्रीय तिरंदाज हे आदिवासी भागातून पुढे आले आहेत. त्यांच्यामध्ये तिरंदाजीचे कौशल्य हे उपजतच असते. हे हेरून तिरंदाजी संघटनेमार्फत देशातील आदिवासी भागामध्ये हे गुणवान खेळाडू हेरण्याचे काम सतत सुरू आहे. त्यातच केंद्र सरकारचा ‘खेलो इंडिया’ हा उपक्रम गुणवान खेळाडू हेरण्यासाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. मी पदाधिकारी आहेच, पण त्याआधी एक तिरंदाज आहे. त्यामुळे खेळाडू म्हणून कोणत्या सुविधा आवश्यक आहेत त्याची मला जाण आहे. क्रिकेटप्रमाणेच तिरंदाजीचे महत्त्व देशात वाढवण्याचे ध्येय मी बाळगले आहे. क्रिकेटने आंतरराष्ट्रीय उंची गाठली आहे, तसेच तिरंदाजीत आंतरराष्ट्रीय दर्जावर देशाचे नाव उंचवायचे आहे.

’ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या तिरंदाजांकडून पदकाची अपेक्षा बाळगता येईल का?

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये यंदा भारत तिरंदाजीतून पदक मिळवेल याची खात्री आहे. अतनू दास, दीपिका कुमारीसारखे खेळाडू याआधी ऑलिम्पिक खेळले आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये थोडक्यात तिरंदाजीतील पदक हुकले होते. मात्र गेल्या चार वर्षांत कोरिया, अमेरिका, चायनीज तैपेई यांसारख्या देशांच्या खेळाडूंना भारताने नमवले आहे. या स्थितीत भारताचे तिरंदाज ऑलिम्पिकमध्येही या अव्वल देशांच्या खेळाडूंना नमवण्याची क्षमता बाळगून आहेत. भविष्यातील चांगले तिरंदाज घडवण्यासाठी देशांतर्गत पातळीवर विविध वयोगटांतील स्पर्धाचे सातत्याने आयोजन संघटनेकडून करण्यात येते. त्याला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे या बाबी स्वागतार्ह आहेत.