|| धनंजय रिसोडकर

आठवडय़ाची मुलाखत: राही सरनोबत, आंतरराष्ट्रीय नेमबाज

कोणत्याही खेळात वेग वाढवत नेणे आणि त्या वेगातील सातत्य प्रदीर्घ काळ कायम राखणे, हे त्या मानाने काहीसे सोपे असते. त्याउलट शरीर आणि मन स्थिर ठेवणे हे जास्त अवघड असते, असे मत आशियाई क्रीडा स्पध्रेतील सुवर्णपदक विजेती महाराष्ट्रकन्या राही सरनोबतने व्यक्त केले.

‘‘नेमबाजी आणि अन्य खेळांमध्ये सातत्याच्या दृष्टीने खूप फरक पडतो. अन्य खेळांमध्ये खेळाडूचा फॉर्म हा किमान सहा-आठ महिने कायम राहत असल्याने त्या काळातील त्याची कामगिरी साधारणपणे एकाच दर्जाची असते. मात्र नेमबाजीत लागोपाठच्या दोन स्पर्धाच्या कामगिरीतही प्रचंड फरक दिसून येतो. मनाची एकाग्रता त्याच स्तरावर ठेवणे केवळ अशक्य असते. मन अस्थिर असेल, तर शरीरदेखील साथ देत नाही,’’ असे राहीने सांगितले. आता थेट २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकवर नजर ठेवूनच पुढील नियोजन करणाऱ्या राहीशी केलेली खास बातचीत-

  • दीड वर्षांहून अधिक काळ खेळापासून दूर राहिल्यानंतर आशियाई सुवर्णपदक मिळवणे, हा प्रवास किती कष्टप्रद होता आणि इतके मोठे यश पुन्हा मिळवू शकू, असे वाटत होते का?

खरे तर २०१५पासूनच मला हाताचा त्रास जाणवू लागला होता. पण मी त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य होत नव्हते. अखेरीस मला शस्त्रक्रिया करून सावरण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे सांगण्यात आले. तोच कालावधी मला खूप वाटत होता. पण प्रत्यक्षात २०१६च्या प्रारंभापासून ते २०१७च्या उत्तरार्धापर्यंत म्हणजे दीड वर्षांहून अधिक काळ माझा हात पूर्वपदावर येऊ शकला नव्हता. त्यामुळे इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपण आशियाईसारख्या स्पर्धेत खेळू आणि पदक मिळवू असे अजिबात वाटले नव्हते. पण जिद्दीने केलेले प्रयत्न आणि मनाच्या निर्धारामुळेच मोठे यश मिळवणे शक्य झाले.

  • खेळापासून लांब असताना नवे खेळाडू आपल्याला मागे टाकतील, असे कधी वाटले का?

होय, इतका प्रदीर्घ काळ दूर राहिल्यानंतर आपण मागे पडू, नव्याने आलेले १५ -१६ वर्षांचे नेमबाज आपल्यापेक्षा खूप पुढे जातील आणि आपल्याला त्यांना गाठणे अवघड होईल, असे सगळे विचार मनात यायचे. त्यामुळे अधिकच नैराश्य यायचे. पण सुदैवाने २०१७ प्रशिक्षक म्हणून नेमलेल्या जर्मनीच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या मुन्खबयार डोर्जसुरेन यांच्यामुळे मी तरले. कारकीर्द ऐन बहरात असताना मुलीच्या जन्मासाठी दोन वर्षे त्या नेमबाजीपासून लांब राहून मग ऑलिम्पिक व विश्वचषकात पदकासह पुनरागमन केले होते. ती बाब त्यांनी माझ्या मनावर ठसवली. त्यामुळेच खेळापासून दूर राहिलो म्हणजे सारे काही संपले असे नाही, हे मला पटले. तसेच विजेतेपद कसे गाठायचे, हा दृष्टिकोन त्यांनी मला दिल्याने या पदकाचे श्रेय त्यांनाही जाते.

  • अन्य खेळांमध्ये खेळाडूंचा फॉर्म प्रदीर्घ काळ टिकून त्यांच्या कामगिरीत सातत्य राहते. मात्र नेमबाजीत बऱ्याचदा तसे घडत नाही, असे का होते? मनाचे स्थैर्य आणि एकाग्रता कायम राखणे अधिक अवघड आहे का?

हो, खरेच जास्त अवघड असते. मी एशियाडमध्ये सुवर्णपदक मिळवले, मात्र त्यानंतर कोरियातील जागतिक नेमबाजी स्पर्धेत मी खूप पिछाडीवर पडले. मी मानसिकदृष्टय़ा थकले आहे, हे माझे मला कळत होते. पण स्पर्धेत उतरल्यावर हे सत्य मी माझ्याच मनाशीदेखील कबूल करू शकत नव्हते. कारण एकदा मनानेच तसे सांगितले, तर पुढे काहीच जमत नाही. त्यामुळे तिथे सर्वोत्तम प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. त्यामुळेच नेमबाजी हा सातत्यपूर्ण सरावाच्या परिश्रमासह शरीराइतकेच मनोवस्थेवर तुम्ही कसे नियंत्रण राखता, त्यावर यश निश्चित करणारा क्रीडा प्रकार आहे.

  • लंडन हुकले, रिओला तू मुकलीस, आता टोकियो ऑलिम्पिकसाठी काय तयारी सुरू आहे?

लंडन ऑलिम्पिक वेळी पात्र होणे, हेच माझ्यासाठी मोठे स्वप्न होते. त्यामुळे २०१२मध्ये तेवढय़ा कामगिरीवरच मी समाधानी झाले असेन. मग २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे भाग घेता आला नव्हता. पण टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायचे मोठे ध्येय माझे शिल्लक आहे.