भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्टला संध्याकाळी सात वाजल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर वर्षभर धोनी भारतीय संघाबाहेर आहे. काही जणांना तो टी-२० विश्वचषकात पुनरागमन करेल अशीही आशा होती. पण त्यांची ही आशा फोल ठरवत धोनीने निवृत्ती स्विकारणं पसंत केलं. धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच…सर्व क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव व्हायला लागला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी धोनीला निवृत्तीचा सामना मिळायला हवा असं मत व्यक्त केलं. इतकच नव्हे तर सोरेन यांनी पुढे जात बीसीसीआयला धोनीसाठी निरोपाचा सामना आयोजित करण्याची मागणीही केली.

सोरेन यांच्या मागणीनंतर सोशल मीडियावरही चाहत्यांमध्ये धोनीला निरोपाचा सामना मिळायला हवा या मागणीला जोर धरायला लागला. loksatta.com ने ही आपल्या वाचकांना याबद्दल प्रश्न विचारुन त्यांचं मत जाणून घेतलं. लोकसत्ता ऑनलाईनच्या वाचकांचा कौलही धोनीला निरोपाचा सामना मिळायला हवा असंच आहे. फेसबूक पेजवर २ हजारापेक्षा जास्त वाचकांनी आपलं मत नोंदवलं, ज्यात ७३ टक्के वाचकांचं मत धोनीला निरोपाचा सामना मिळायला हवा असं होतं. उर्वरित २७ टक्के लोकांनी आपलं मत विरोधात दिलं.

दुसरीकडे ट्विटरवरही वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. ट्विटरवर १ हजार ६०० पेक्षा जास्त वाचकांनी आपलं मत नोंदवलं.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली तरीही पुढची काही वर्ष तो आयपीएल खेळत राहणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालाधीत आयपीएलचा तेरावा हंगाम युएईत रंगणार आहे. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याचा साथीदार सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली. धोनीसह चेन्नई संघाचे खेळाडू सध्या आयपीएलची तयारी करत आहेत.