आतापर्यंत मला जीवनात जी काही प्रसिद्धी व पैसा मिळाला आहे, त्याचे श्रेय खो-खो खेळाला द्यावे लागेल. या खेळाचे माझ्यावर आयुष्यभर ऋण राहतील, असे ‘एकलव्य’ विजेता महाराष्ट्राचा खो-खोपटू मिलिंद चवरेकरने सांगितले. सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने पुरुष व महिला या दोन्ही विभागात अजिंक्यपद मिळविले. पुरुषांमध्ये त्यांनी रेल्वेची विजेतेपदाची मक्तेदारी मोडून काढीत हे यश पटकावले. या विजेतेपदात चवरेकरने केलेल्या सातत्यपूर्ण व अष्टपैलू खेळाचा मोठा वाटा होता. याबाबत चवरेकरशी केलेली खास बातचीत-

* विजेतेपद मिळवण्याचा आत्मविश्वास होता काय?
विजेतेपद मिळविण्याची यंदा आम्हाला खात्री होती. आपल्याला हे यश मिळवण्यासाठी कोणते संघ आव्हानात्मक आहेत, याचा आम्ही बारकाईने अभ्यास केला होता. तसेच या स्पर्धेसाठी पुण्यातील अखिल भारतीय स्पर्धा सुरू असतानाच उरलेल्या वेळेत आमच्या संघाचा सराव होत असे. त्याचा फायदा आम्हाला सोलापूर येथील स्पर्धेच्या वेळी झाला. राष्ट्रीय स्पध्रेतील प्रत्येक सामन्याकरिता आम्ही वेगवेगळे नियोजन करीत होतो. उपांत्य फेरीत कोल्हापूरविरुद्ध सहज विजय मिळवल्यानंतर विजेतेपद आपलेच आहे असा आत्मविश्वास निर्माण झाला.

* अंतिम लढतीविषयी काय नियोजन केले होते ?
रेल्वेचे खेळाडू कोणत्या शैलीने संरक्षण करतात, ते गडी कसे टिपतात, त्यांची मुख्य मदार कोणत्या खेळाडूंवर आहे, याचेही आम्ही निरीक्षण केले होते. आमचे प्रशिक्षक एजाज शेख यांनी त्यादृष्टीने नियोजन केले व आम्हाला अनुकूल होईल अशी व्यूहरचनाही केली. या सामन्यात आमच्यावर कोणतेही दडपण नव्हते. पूर्वार्धात आम्ही दोन गुणांची आघाडी घेतली, तीच आघाडी आमच्यासाठी निर्णायक ठरली.

* या खेळातील आजपर्यंतच्या यशाचे श्रेय तू कोणाला देशील ?
माझे आईवडील तसेच मला या खेळाचे प्रशिक्षण देणारे आमच्या हिंदकेसरी संघाचे मार्गदर्शक सुधाकर माने व मिलिंद सावर्डेकर यांना मी या यशाचे श्रेय देईन. महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचाही माझ्या पुरस्कारात वाटा आहे.

* पुरस्कारानंतर तुझ्या गावातील वातावरण कसे होते ?
आमच्या कवठेपिरान गावात माझे भव्य स्वागत झाले. अनेक ठिकाणी माझ्या स्वागताची पोस्टर्स लावली होती. एखादा शूरवीर लढाई जिंकून मायभूमीत परत येतो, तेव्हा त्याचे जसे स्वागत केले जाते, तसे स्वागत मिळण्याचे मला भाग्य लाभले. एकलव्य पुरस्कार हा केवळ माझ्यासाठी नव्हे तर आमच्या गावाचाच हा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे आमच्या गावातील अनेक शालेय खेळाडूंना या खेळासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

* खो-खो खेळाची लीग स्पर्धा व्हावी, असे तुला वाटते काय ?
होय, नक्कीच. अशा लीगमुळे या खेळाची लोकप्रियता वाढण्यास मदत होईल. या खेळात करिअर करू इच्छिणारे किंवा करिअर करणारे बरेचसे खेळाडू आर्थिकदृष्टय़ा बेताचीच परिस्थिती असलेल्या घरांतून आलेले असतात. त्यांना या लीगमुळे आर्थिक फायदा होणार आहे. तसेच स्पर्धात्मक अनुभवामुळे खेळाचा दर्जाही उंचावण्यास मदत होईल. हा खेळ घराघरात पोहोचविण्यासाठी खेळाची व्यावसायिक लीग होण्याची नितांत आवश्यकता आहे.

* आता तुझे आगामी ध्येय काय आहे?
एकलव्य पुरस्कार मिळाला तरी मी समाधानी राहणार नाही. अजून मला महाराष्ट्राला भरपूर यश मिळवून द्यायचे आहे. खेळण्याबरोबरच नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचीही माझी इच्छा आहे. हा खेळ अनेक खेळांचा आत्मा आहे, हे मी अधिकाधिक मुलामुलींना पटवून देण्यासाठी, तसेच या खेळात करिअर करण्यासाठी किती उत्तम संधी आहे हे त्यांना समजावून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.