News Flash

क्रिकेट रणरागिणी

घरात क्रिकेटचे बाळकडू अगदी न कळत्या वयात स्मृतीला मिळाले.

(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

स्मृती मानधना, अर्जुन पुरस्कार

सांगलीचे नाव सातासमुद्रापार पोहोचवण्यात ज्या दोन मुलींनी यश मिळवले, त्यामध्ये बुद्धिबळाच्या ६४ घरांवर अधिराज्य गाजवणारी भाग्यश्री ठिपसे आणि आता क्रिकेटची मैदाने गाजवणारी २२ वर्षांची स्मृती मानधना यांचा समावेश होतो. भाग्यश्रीने बुद्धिबळात सर्वोच्च कामगिरी नोंदवत अर्जुन पुरस्कार मिळवला, तर स्मृतीने क्रिकेट विश्वात आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अर्जुन पुरस्कारावर नाव कोरले.

संथ वाहणाऱ्या कृष्णेच्या पाण्याची खोली जशी काठावर उभा राहून अंदाज बांधता येत नाही, तशीच क्रिकेटच्या मदानावर स्मृतीच्या डावखुऱ्या फलंदाजीचा अंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजाला येत नाही. मदानावर सलामीवीर म्हणून उतरणारी स्मृती आपल्या बॅटच्या जबरदस्त तडाख्याने भारतीय महिला संघासाठी दमदार धावा करते, हीच विश्वासार्हता तिने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी दाखवून दिली. भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर स्मृतीने क्रिकेटचाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

घरात क्रिकेटचे बाळकडू अगदी न कळत्या वयात स्मृतीला मिळाले. वडीलबंधू श्रवण हा क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द घडवण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी त्याला प्रोत्साहन द्यायला आणि क्रिकेटचे धडे देण्यासाठी स्मृतीचे वडील श्रीनिवास हे मदानावर जात. यावेळी स्मृतीचे वय होते अवघे दोन-तीन वर्षांचे. वडील आणि मोठा भाऊ बाहेर जात आहेत म्हटल्यावर त्यांच्या अगोदर स्कूटरवर स्मृती जाऊन बसलेली असायची. भावाचा खेळ पाहात मदानावरच चेंडूफळीशी तिची गट्टी जमली. समोर आलेला चेंडू बॅटने टोलावला तर बघायला येणारे टाळ्या वाजवतात, प्रोत्साहन देतात, कौतुक करतात, हे त्या बालमनाला भावले. मग काही दिवसांतच तिने वडिलांकडे मलाही क्रिकेट खेळायचे आहे, असा हट्ट धरला. तिथेच तिच्या जीवनाला एक दिशा मिळाली. अशा पद्धतीने भारतीय महिला क्रिकेट संघासाठी सांगलीच्या मदानावर एक हिरकणी जन्माला आली.

प्रशिक्षक अनंत तांबवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने क्रिकेटचे धडे गिरवले. इंग्लडच्या लॉर्ड्स मदानावर असो, वा आंतरराष्ट्रीय मदानावरील वातावरणामध्ये कसे क्रिकेट खेळायचे याचे मार्गदर्शन त्यांनी तिला दिले. याचप्रमाणे शारीरिक तंदुरस्ती कशी राखायची याचे धडे अकादमीचे प्रशिक्षक एस. एल. पाटील यांनी दिले. िहदी गाण्याची आवड जोपासत असताना तिने क्रिकेटमधील सराव कधी कमी होऊ दिला नाही. यामुळेच तिचे भारतीय संघात स्थान पक्के झाले आहे.

स्मृतीने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने चार शतके आणि १३ अर्धशतकांसह १६०२ धावा केल्या आहेत. ट्वेन्टी-२०च्या जमान्यात ती हुकमी फलंदाज म्हणून ओळखली जाते. तिने ४४ सामन्यांमध्ये पाच अर्धशतकांसह ८६७ धावा केल्या आहेत. याचप्रमाणे दोन कसोटी सामन्यांत ८१ धावा केल्या आहेत. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. यंदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) वर्षांतील सर्वोत्तम महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार तिने पटकावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 1:13 am

Web Title: loksatta sport interview smriti mandhana
Next Stories
1 डॉ. सविता पांढरे यांना मास्टर्स अ‍ॅथलेटिक्समध्ये सात पदके
2 ली चोंग वेईला नाकाचा कर्करोग
3 Asian Team Snooker Championship – भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान, पाकिस्तानी चमूला सुवर्णपदक
Just Now!
X