08 December 2019

News Flash

वारसा वडिलांकडून, पण प्रेरणा आईची!

आठवडय़ाची मुलाखत : आदित्य सरवटे, विदर्भाचा फिरकीपटू

आठवडय़ाची मुलाखत : आदित्य सरवटे, विदर्भाचा फिरकीपटू

रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या आदित्य सरवटेने चमकदार कामगिरीचे श्रेय कुटुंबीयांना दिले आहे. मला आजोबा आणि वडिलांकडून क्रिकेटचा वारसा होता. पण आईने मला पाठबळ दिले आणि कोणत्याही परिस्थितीत चेहऱ्यावर हास्य कायम ठेवायचा मोलाचा सल्लाही दिला. तिच्या प्रेरणेमुळेच हे यश मिळाले, असे आदित्यने सांगितले. यंदाच्या रणजी हंगामात ५५ बळी घेणाऱ्या आदित्यने अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

‘‘मी साडेतीन वर्षांचा असताना वडिलांचा अपघात झाला. ते आजही अंथरुणाला खिळून आहेत. आईने नोकरी करून घर चालवले आणि बाबांचा सांभाळ केला व माझ्या सर्व गरजा पूर्ण केल्या. आईने कधीही कोणत्याच गोष्टीची तक्रार केली नाही आणि खंबीरपणे सर्व अडचणींवर मात केली,’’ असे आदित्यने सांगितले. आदित्यच्या कारकीर्दीविषयी केलेली खास बातचीत-

  • क्रिकेटबद्दल आवड कशी निर्माण झाली?

घरात मुळात क्रिकेटचे वातावरण होते. माझे वडील आनंद सरवटे क्रिकेटपटू होते आणि आजोबा श्याम सरवटे आंतरराष्ट्रीय समालोचक होते. त्यामुळे घरी क्रिकेटचे वातावरण होतेच. मात्र १८व्या वर्षांपासून मी खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. प्रवीण िहगणीकर क्रिकेट अकादमीपासून माझा प्रवास सुरू झाला. मग २०१५-१६मध्ये मी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

  • दुसऱ्यांदा रणजी जेतेपदाची आशा होती का?

गतवर्षीचे जेतेपद योगायोगाने विदर्भाला मिळाले, असे म्हटले जायचे. त्यामुळे आम्हाला सिद्ध करून दाखवण्याची ही उत्तम संधी होती आणि ते आम्ही करून दाखवले. यंदा आमची सुरुवात थोडी अडखळती झाली असली, तरी पहिल्या सामन्यात आम्हाला फॉलोऑन मिळाल्यानंतरही दोन दिवस खेळलो आणि डाव संपुष्टात येऊ दिला नाही. आत्मविश्वासाने पुनरागमन केले. अजिंक्यवीर संघाप्रमाणे दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले.

  • तुझ्या आयुष्यात क्रिकेट किती महत्त्वाचे आहे?

क्रिकेटशिवाय मला काही सूचत नाही. अर्थात क्रिकेट आणि परिवार माझ्या आयुष्यातील दोन सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. क्रिकेटने मला आयुष्य दिले. माझे घर सावरून मला ओळख दिली. क्रिकेट नसते तर मी कदाचित एवढा यशस्वी झालो नसतो.

  • प्रशिक्षक चंद्रकांत पंडित सरांबद्दल काय सांगशील?

पंडित सर माझ्यासाठी आणि एकूणच संघासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते आम्हाला नेहमी प्रभावित करतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर काही आहे. गेल्या वर्षी ते प्रशिक्षक म्हणून  आले, तेव्हा त्यांची शैली अनेकांना पटली नव्हती. कारण ते कडक आणि शिस्तप्रिय आहेत. मात्र जसजसा वेळ आम्ही त्यांच्यासोबत घालवत गेलो, तेव्हा समजले की यामध्ये आपलाच फायदा आहे. दोन वर्षांत दोन विजेतेपदं ही सोपी बाब नाही. परंतु पंडित सरांनी ही किमया करून दाखवली. पूर्वी विदर्भाला कमी लेखायचे, मात्र आता रणजी विजेता संघ म्हणून पाहिले जाते, याचा अभिमान वाटतो.

  • विदर्भाला पुढच्या वर्षी जेतेपदाची हॅट्ट्रिक साधता येईल का?

नक्कीच, रणजी करंडक विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी आम्हाला सुवर्णसंधी लाभली आहे. त्यामुळे त्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत. त्यात हंगामपूर्व सरावालाही आम्ही प्राधान्य देणार आहोत. मंगळवारपासून इराणी चषक सामन्याला प्रारंभ होत असल्याने सध्या त्याकडे लक्ष केंद्रित करत आहोत. कारण सलग दुसऱ्या वर्षी इराणी चषक जिंकण्याची संधी आम्हाला आहे.

First Published on February 11, 2019 12:23 am

Web Title: loksatta sport interview with aditya sarwate
Just Now!
X