आठवडय़ाची मुलाखत : अल्फोन्से सिम्बू, टांझानियाचा ऑलिम्पिकपटू

केनिया व इथिओपियाच्या धावपटूंची मक्तेदारी मोडून काढत टांझानियाच्या अल्फोन्से सिम्बूने मुंबई मॅरेथॉनमध्ये जेतेपदकाची कमाई केली. रविवारी पार पडलेल्या या स्पध्रेत सिम्बूने केनियाच्या जोशुआ किप्कोरीरचे कडवे आव्हान परतवून देत मुंबई मॅरेथॉनमध्ये दणक्यात पदार्पण केले. मुंबईत पहिल्यांदाच आलेल्या सिम्बूने टांझानियात डोंगराळ भागातील सरावामुळेच येथील अडथळ्यांवर मात करणे सोपे झाल्याचे सांगितले.

‘‘मायदेशात डोंगरमार्गात सराव करावा लागतो. त्यामुळे मुंबई मॅरेथॉनच्या स्पर्धामार्गात येणारा पूल आणि वळणांची अडचण जाणवली नाही. पण हा मार्ग सरळ असता तर वेळेत सुधारणा झाली असती,’’ असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले. सिम्बूने मुंबई मॅरेथॉन आणि रिओ ऑलिम्पिक स्पध्रेविषयी केलेली बातचीत-

  • पहिल्या १५-१६ किलोमीटर अंतरापर्यंत तू अव्वल तिघांमध्येही नव्हतास. पण अखेरच्या क्षणाला तू आणि जोशुआने निर्विवाद आघाडी घेत इतरांना मागे टाकलेत. विजयासाठीचा आवश्यक वेग तू कधी घेतलास?

टांझानियात डोंगराळ भागात सराव करीत असल्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीला आव्हान देण्यासाठी सज्ज असतो. या स्पध्रेत सहभागी होण्यापूर्वी माझ्या काही जुन्या मित्रांनी मुंबईतील भौगोलिक परिस्थितीची माहिती दिली होती. त्यामुळे सराव करताना मला सुलभ झाले. सुरुवातीला गती किंचितशी कमी होती, परंतु १६ किमीनंतर मी वेग वाढवला. स्पर्धेच्या मार्गात अनेक वळणे असल्याने वेगावर अंकुश लागला. अधिक चांगल्या वेळेत शर्यत पूर्ण करू शकलो असतो.

  • रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत तू २ तास ११ मिनिटे १५ सेकंदांची वेळ नोंदवून पाचवे स्थान निश्चित केले होते. मुंबई मॅरेथॉनमध्ये तू कमी वेळात शर्यत पूर्ण करून विजेतेपद पटकावलेस. रिओतील अनुभव उपयुक्त ठरला का?

हो नक्कीच. रिओ ऑलिम्पिकमध्ये विविध देशांतून अव्वल खेळाडू सहभागी होतात. त्यामुळे त्या स्पध्रेचा दर्जाही तितकाच उच्च असतो. तेथील अनुभवाचा इतर स्पर्धामध्ये फायदा मिळतो. रिओनंतर मी पहिल्यांदाच मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि या कामगिरीबाबत मी समाधानी आहे.

  • रिओ ऑलिम्पिकच्या निरोप समारंभात तू ध्वजधारक होतास. त्या प्रवासाबद्दल काय सांगशील?

ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे इतरांप्रमाणे माझेही स्वप्न होते आणि ते पूर्ण झाले. त्यावर विजयी मोहोर उमटवता आली असती तर अधिक आनंद झाला असता. पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तेथील आव्हानांचा सामना करताना कसोटी पणाला लागली.

  • मुंबईत विजयाची खात्री होती का?

तसा विचार केला नव्हता. सर्वोत्तम कामगिरी करण्याचे लक्ष्य ठेवून येथे आलो होतो. विजयी होऊन परतत असल्याचा आनंद आहे. पुढील वर्षी खडतर आव्हान मिळेल, अशी अपेक्षा करतो.