|| तुषार वैती

आठवडय़ाची मुलाखत : अमित पांघल, भारताचा बॉक्सर

सध्या भारतीय बॉक्सिंगला चांगले दिवस आले असून पुरुषांसोबत महिला खेळाडूही पदकांची लयलूट करत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर मोहोर उमटवणारा हरयाणाचा बॉक्सर अमित पांघलने ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूवर दोन वेळा सरशी साधल्यामुळे त्याच्याकडे मोठय़ा आशेने पाहिले जात आहे. पांघलने गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्याआधी राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आता ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरणे हेच माझे ध्येय असल्याचे अमित पांघलने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अमितशी केलेली ही खास बातचीत-

  • आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि आता आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर काय भावना आहेत?

दोन्ही स्पर्धासाठी मी कसून तयारी केली होती. विशेष म्हणजे, मला माझ्या ४९ किलो वजनी गटाऐवजी आता ५२ किलो या नव्या वजनी गटात लढावे लागत आहे. त्यामुळे मी अधिकच जोमाने तयारी करत होतो. त्याच मेहनतीचे फळ मला मिळाले. देशासाठी सुवर्णपदक पटकावण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी या स्पर्धेत उतरलो होतो. उल्लेखनीय कामगिरीमुळे माझी यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

  • तुला ५२ किलो या नव्या वजनी गटात खेळावे लागत आहे, त्याची तयारी कशी केली होतीस?

नव्या गटात खेळण्याचे फार मोठे आव्हान माझ्यासमोर होते. या गटात खेळणाऱ्या अव्वल बॉक्सर्सच्या कामगिरीचा मी अभ्यास करत आहे. मात्र पहिल्याच स्पर्धेत यश मिळाल्याने मी आशावादी आहे. पहिल्यांदाच या गटात खेळत असल्याने माझ्यावर कोणतेही दडपण नव्हते. पूर्वीपेक्षा अधिक वजनी गटात खेळताना मोठय़ा प्रमाणात ताकद खर्च करावी लागते. त्यामुळे अखेपर्यंत ताकद आणि ऊर्जा कशी कायम राखता येईल, या गोष्टीवर मी मेहनत घेत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या स्वरूपानुसार हा वजनी गट येत असून त्यामुळे मला आशियातील खेळाडूंचा खेळ जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. आता या स्पर्धेत खेळल्याचा फायदा मला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत होणार आहे.

  • उझबेकिस्तानचा २०१६ रिओ ऑलिम्पिकचा विजेता हसनबॉय दुसमाटोव्ह याच्यावर तू दोनदा मात केलीस, त्याच्याविषयी काय रणनीती आखली होतीस?

कोणत्याही अव्वल खेळाडूला हरवणे ही मोठी गोष्ट नसते. पहिल्यांदा हसनबॉयला हरवल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला होता. त्यामुळे यावेळी तो माझ्यासमोर आला, त्यावेळी काहीसा बिथरला होता. त्याचा खेळ अपेक्षेनुसार होत नव्हता. त्यामुळे त्याला हरवताना मला फारसे प्रयास पडले नाहीत. यावेळी पदक माझे आहे, हा आत्मविश्वास असल्यामुळे मला सुवर्णपदक मिळवता आले.

  • तुझे या खेळातील प्रेरणास्थान कोण आहे?

विजेंदर सिंगने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगमध्ये पहिले पदक मिळवून दिले, त्याचवेळी माझा बॉक्सिंगमध्ये श्रीगणेशा झाला होता. विजेंदरचे पदक हे भारतीय बॉक्सिंगसाठी प्रेरणादायी ठरले होते. पण महान बॉक्सर मोहम्मद अली हे माझे प्रेरणास्थान आहे. ते एक अद्वितीय असे बॉक्सर होते. मोहम्मद अली यांचा ठोसे लगावण्याचा वेग भन्नाट होता. वजनाने भरभक्कम असतानाही, त्यांचे पदलालित्य सहजसुंदर असे होते. त्यामुळेच त्यांना प्रेरणास्थानी ठेवून मी खेळ करण्याचा प्रयत्न करत असतो.

  • यापुढे तुझे उद्दिष्ट काय आहे?

ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावणे, हे कोणत्याही खेळाडूचे स्वप्न असते. माझेही तेच उद्दिष्ट आहे. मात्र सर्वप्रथम २०२० टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान पटकावणे, याकडेच माझे लक्ष लागले आहे. ७ सप्टेंबरपासून जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा सुरू होणार आहे, याच स्पर्धेत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्याचे उद्दिष्ट मी आखले आहे. त्यासाठी माझी जोरदार तयारी सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरीस इंडिया खुली बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. त्यात चमकदार कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचबरोबर मी सरावासाठी इटली आणि आर्यलडला रवाना होणार आहे. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून द्यायचे, हा चंग मी मनाशी बांधला आहे.