29 October 2020

News Flash

पुरस्काराद्वारे अपंग खेळाडूंना प्रेरित करण्याचे ध्येय!

दीपा मलिक, खेलरत्न पुरस्कार विजेती गोळाफेकपटू

|| ऋषिकेश बामणे

आठवडय़ाची मुलाखत : दीपा मलिक, खेलरत्न पुरस्कार विजेती गोळाफेकपटू

कारकीर्दीत मिळवलेले आजवरचे सर्व यश हे फक्त स्वत:ला सिद्ध करण्याच्या हेतूमुळेच साध्य झाले असून राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराद्वारे अनेक अपंग खेळाडूंना उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी अधिकाधिक प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा भारताची पॅरालिम्पिक गोळाफेकपटू दीपा मलिकने व्यक्त केली.

४८ वर्षीय दीपाला नुकताच देशातील सर्वोच्च असा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०१६च्या रिओ पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला पहिलेवहिले रौप्यपदक दीपाने मिळवून दिले होते. खेलरत्न पुरस्कार, आगामी आव्हाने आणि पॅराअ‍ॅथलीट्सच्या सद्य:स्थितीवर दीपाशी केलेली ही खास बातचीत.

 खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच्या भावना काय आहेत?

ज्या दिवशी मला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला, तेव्हापासून दररोजच मला विविध कार्यक्रमांत प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते आहे. एरव्ही एखाद्या खेळाडूला पुरस्कार जाहीर केला, की त्याचे प्रतिस्पर्धी अथवा अन्य खेळांतील क्रीडापटू याविषयी नाराजी दर्शवतात, परंतु खेलरत्न पुरस्कारासाठी माझी निवड झाल्यामुळे कोणाचेही मन दुखावल्याचे अद्याप माझ्या तरी कानावर आलेले नाही. त्याशिवाय माझ्यासारख्या पॅराअ‍ॅथलीट्सच्या कामगिरीची दखल घेऊन प्रसारमाध्यमांनी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत मला पोहोचवल्यामुळे चाहत्यांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत, याची जाणीव झाली.

आगामी पॅरालिम्पिक स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे तू जलतरणाकडे वळणार आहेस, हे खरे आहे का?

टोक्यो येथे रंगणाऱ्या २०२०च्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत गोळाफेक आणि भालाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारांचा समावेश नाही. गेली पाच वर्षे मी भारताला किमान एक पदक मिळवून दिले आहे. मात्र पुढील ऑलिम्पिकमध्ये माझा खेळच नसल्याने माघार घेण्यापासून पर्याय नव्हता. थाळीफेकमध्ये माझ्या पाठीला दुखापत होण्याची शक्यता असल्यामुळे मी त्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मला जलतरणाची आवड असली तरी मी फक्त राष्ट्रीय पातळीवरील जलतरणाच्या स्पर्धामध्येच सहभागी होणार आहे. मात्र माझा मुख्य खेळ गोळाफेकच राहील. त्यामुळे तूर्तास मी अन्य खेळाडूंना प्रोत्साहित करण्याबरोबरच २०२२च्या आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धामध्ये देशाला पदक मिळवून देण्यासाठी सराव आणि तंदुरुस्तीवर भर देत आहे.

 कारकीर्दीतील आतापर्यंतच्या प्रवासाविषयी थोडक्यात काय सांगशील?

१९९९ मध्ये ज्या वेळी मला पाठीचा टय़ूमर झाला तेव्हा मी गोळाफेक हा खेळ खेळू शकेन, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. कुटुंबातील सदस्य मला मदतीसाठी नेहमी तयार असायचे; परंतु अनेकदा मी स्वत: त्यांना मदतीसाठी नकार देऊन स्वबळावर एखादे कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. त्यातून मला प्रेरणा मिळायची. कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळवले असले तरी २०१६च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये मिळवलेले रौप्यपदक माझ्या आयुष्यातील नेहमीच अविस्मरणीय आहे. माझ्या कारकीर्दीद्वारे अपंग खेळाडूंना, विशेषत: महिलांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत झटत राहीन.

 पॅराअ‍ॅथलीट्सपटूंना मिळणाऱ्या सोयीसुविधांविषयी तुझे काय मत आहे?

आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या पॅराअ‍ॅथलीट्सना आता बऱ्यापैकी सोयीसुविधा पुरवल्या जातात. अनुभवी प्रशिक्षक, सरावतज्ज्ञ, विविध स्पर्धामुळे जगभरातील दौरे यांसारख्या गोष्टी त्यांना उपलब्ध आहेत. मात्र पायाभूत सुविधांवर अद्यापही लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. विशेषत: अपंग खेळाडूंसाठी पुढाकार घेऊन विविध खेळांच्या अकादम्या सुरू करणे गरजेचे आहे. शासन खेळाडूंना सुविधा देण्यासाठी सज्ज आहे. मात्र घरातील वडीलधाऱ्यांनी आपल्या अपंग मुला-मुलीला प्रोत्साहित करून त्यांना त्यांच्या आवडीच्या खेळात कारकीर्द घडवण्याची संधी दिली पाहिजे, असे मला वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 1:41 am

Web Title: loksatta sport interview with deepa malik mpg 94
Next Stories
1 कोमालिका बारीला जगज्जेतेपद
2 अवघा रंग कबड्डीचा..
3 रहाणेच्या शतकामुळे भारताचे विंडीजवर वर्चस्व
Just Now!
X