आठवडय़ाची मुलाखत: एडगर टॅनर, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष

महिलांच्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय संघाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारतीय महिला संघात अनेक गुणी खेळाडू आहेत. या स्पर्धेतील पदकविजेत्यांपैकी बऱ्याच जणी भविष्यात भारताला अधिक यश मिळवून देतील. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्या देशाच्या प्रतिनिधित्वसुद्धा करू शकतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे (एआयबीए) उपाध्यक्ष एडगर टॅनर यांनी व्यक्त केला. ११ वर्षांनंतर भारतात जागतिक दर्जाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय बॉक्सिंगची वाटचाल, एआयबीएवर आलेले संकट यासंदर्भात टॅनर यांच्याशी केलेली खास बातचीत

  • युवा बॉक्सिंग स्पर्धेच्या आयोजनाबाबत तुम्ही काय सांगाल आणि या स्पर्धेचे यश तुम्ही कोणत्या स्वरूपात मोजता?

गुवाहाटीत ही स्पर्धा खेळवण्याचा आमचा निर्णय सार्थ ठरला. येथील आयोजनाला मी अव्वल श्रेणीचा दर्जा देईन. आतापर्यंत बऱ्याच स्पर्धा मी पहिल्या आहेत, परंतु येथील उद्घाटन सोहळा संस्मरणीय होता. खेळाडूंसाठी पुरवण्यात येणाऱ्या सुविधाही उत्तम दर्जाच्या आहेत. आयोजकांच्या उत्तम समन्वयामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. त्यामुळे त्यांना कोणताही सल्ला देऊ इच्छित नाही. त्यांनी यापुढेही असेच काम करत राहावे ही इच्छा. प्रेक्षकांचा उत्साह हेच स्पर्धेचे प्रमुख यश आहे. गुवाहाटीमध्ये सर्वत्र या स्पर्धेची चर्चा आहे.

  • भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल तुमचे काय मत आहे?

भारतीय खेळाडूंचे कौतुक करावे तितके कमी आहे. इतक्या सहजतेने हे ठोसे लगावतात, त्यांच्या पायाची हालचाल, प्रतिस्पर्धीना चकवण्याचे वेगवान कौशल्य हे सर्व उल्लेखनीय आहे. यापैकी बऱ्याच जणींना टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहायला आवडेल. मेरी कोम, सरिता देवी यांचा वारसा चालवण्याची धमक या खेळाडूंमध्ये आहे. भारतीयच नव्हे, तर सहभागी झालेल्या इतर देशांच्या खेळाडूंनीही आपापले कौशल्य सिद्ध केले आहे. भविष्यात त्याही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवतील.

  • टोकियो ऑलिम्पिकमधील महिलांच्या गटसंख्येत होणारी वाढ आणि पुरुष गटांवर येणारी मर्यादा, याबाबत तुम्ही काय सांगाल?

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्हीही चांगला खेळ करू शकतो, हे महिला बॉक्सिंगपटूंनी सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पण त्याचवेळी पुरुष बॉक्सिंगपटूंवर अन्याय होऊ देणे चुकीचे ठरेल. टोकियो ऑलिम्पिकमधील बॉक्सिंगच्या गटांबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसोबत आमची चर्चा सुरू आहे. मात्र ते बॉक्सिंगचा कोटा वाढवण्याच्या तयारीत नाहीत. त्यांचा जो निर्णय असेल तो मान्य करायला हवा. त्यामुळे त्यावर आताच प्रतिक्रिया देणे अयोग्य ठरेल.

  • एआयबीएच्या अध्यक्षांवरील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आणि त्यानंतर त्यांचा राजीनामा, या घटनांचा संघटनेवर परिणाम झाला का?

गेल्या चार महिन्यांचा काळ आमच्यासाठी खडतर होता. पण अध्यक्ष वू चिंग-कुओ यांच्या राजीनाम्यानंतर परिस्थिती सुधारत आहे. या घटनेने असोसिएशनमधील सर्व पदाधिकाऱ्यांना एकमेकांच्या जवळ आणले. नव्याने विचार करण्यास भाग पाडले. एकत्र येऊन आम्ही पुन्हा बॉक्सिंगसाठी नव्या दमाने कार्य करत आहोत.

  • भविष्यात भारताला आणखी स्पर्धाच्या यजमानपदाचा मान मिळेल का?

२०१८मध्ये भारतात वरिष्ठ महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. भारतीय संघटनेला स्थापन होऊन अधिक काळ झाला नसतानाही त्यांनी युवा स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करून दाखवली. त्यामुळे २०१८ची स्पर्धाही यापेक्षा अधिक यशस्वी होईल अशी आशा करायला हरकत नाही. मात्र भविष्यातील स्पर्धा आयोजनाबाबत विचाराल तर सर्व देशांना समान संधी मिळायला हवी. भारतातील नियोजनावर मी अत्यंत खूश आहे, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना अधिक स्पर्धा आयोजनाची संधी मिळेल. त्याचा निर्णय आमची समिती घेईल.