आठवडय़ाची मुलाखत : फैज फजल, विदर्भाचा कर्णधार

विदर्भ क्रिकेट संघाने रणजी करंडकापाठोपाठ इराणी चषकावरही नाव कोरले. यामध्ये सांघिक योगदान महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे विदर्भ संघाला कमकुवत समजणाऱ्यांचे मतपरिवर्तन झाले असेलच. त्यामुळे भविष्यात होऊ घातलेल्या सर्व स्पध्रेत विजेतेपद टिकवून ठेवण्याचे आव्हान आमच्यासमोर असणार आहे. केवळ एका हंगामात जेतेपद पटकावून आम्ही थांबणार नाही. पुढील अनेक हंगामांत हे जेतेपद कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, असे मत विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार फैज फजलने व्यक्त केले. संघाच्या कामगिरीबाबत आणि पुढील वाटचालीबाबत त्याच्याशी केलेली चर्चा

  • कर्णधारपदाखाली रणजी आणि आता इराणी चषक जिंकल्याचा आनंद शब्दात कसा व्यक्त करशील?

वर्षांतील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून इराणीकडे बघितले जाते. त्यामुळे नक्कीच माझ्यासोबतच ही विदर्भासाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे. यंदाच्या वर्षांत आम्ही रणजी आणि इराणी असे दोन्ही चषक जिंकलो. यामध्ये संघातील प्रत्येक खेळाडूचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. चंदू सरांसारखे प्रशिक्षक आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. त्यांचे आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभले. इराणी चषक स्पध्रेत विदर्भ संघाने खेळावे हे माझे स्वप्न पूर्ण झाले.

  • संघातील युवा खेळाडूंच्या कामगिरीबद्दल काय वाटते?

पूर्ण संघाच्या योगदानाला मी सलाम करेल. त्यांनी अतिउत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी स्पध्रेसाठी किती मेहनत घेतली हे मी बघितले आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी यशस्वी पार पाडली. रजनीश गुर्बानीचे ४० पेक्षा अधिक बळी, अक्षयचे ३५ बळी, आर. संजय, गणेश सतीशचे आठशेहून अधिक धावा, माझ्या एक हजाराच्यावर धावा त्यामुळे युवा खेळाडूंचे योगदान त्यांच्या कामगिरीवरून स्पष्ट होते.

  • इराणीच्या तयारीसाठी विशेष काही प्रशिक्षण घेतले का?

इराणीत विजयासाठी आम्ही विशेष कोणतेच प्रशिक्षण घेतले नाही. रणजी चषकासाठी ज्याप्रमाणे आम्ही तयारी केली तशीच इराणी करंडकासाठी केली. नेटमध्ये सराव कमी केला. मात्र सामन्याप्रमाणे खुल्या मदानावर मुख्य खेळपट्टीवरच सराव करण्यावर आम्ही जास्त भर दिला. त्यामध्ये प्रत्यक्ष तुमच्या चुका लक्षात येतात. त्याने जास्त आत्मविश्वास वाढतो. अभ्यास जेवढा चांगला कराल तसाच निकाल मिळेल हे लक्षात ठेवून सराव केला. त्याचा फायदा आम्हाला मिळाला. चंदू सर, सुब्रतो बॅनर्जी सरांचीही भूमिका विजयात मोलाची ठरली.

  • भारतीय संघात पुनरागमनाची अपेक्षा आहे काय?

मला भारतीय संघात पुनरागमन करायचे आहे, म्हणूनच मेहनत घेत आहे. तेच माझे ध्येय आहे. कसोटी किंवा एकदिवसीय सामने, भारतासाठीच खेळण्याची आशा अजूनही कायम आहे. एक हजार धावांचा टप्पा एका वर्षांत गाठणे सोपी बाब नाही. ज्या वेळी मला वाटेल की भारतासाठी खेळू शकणार नाही, त्या दिवशी मी क्रिकेट खेळणे सोडेन.

  • चषक जिंकण्याची किती शाश्वती होती?

आम्ही जिंकण्यासाठी शंभर टक्के योगदान द्यायचे असे ठरवले होते. धावांचा डोंगर उभा केल्यानंतर आमचा विजय निश्चित झाला होता. मात्र तो डोंगर उभा करण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली. वसीम जाफरच्या २८६ धावा विजयासाठी मोठी जमेची बाजू ठरल्या. त्यानंतर माझी आणि आर. संजयची सलामीची मोठी धावसंख्या मोलाची ठरली. सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली तर संघ स्थिरावतो हे लक्षात घेऊन फलंदाजी केली. तसेच गणेशची खेळी आणि अपूर्वचे शतक महत्त्वपूर्ण ठरले. रजनीश आणि सरवटेमुळे सामन्यात पुनरागमन करू शकलो.