आठवडय़ाची मुलाखत : जसवीर सिंग, जयपूर पिंक पँथर्स संघाचा कबड्डीपटू

प्रो कबड्डी लीगमुळे या खेळाची लोकप्रियता वाढत चालली आहे. परदेशी खेळाडूंचाही यात वाढता सहभाग आहे. मात्र नजीकच्या काळात इराण, दक्षिण कोरिया, बांगलादेश, आदी संघ आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी भारताच्या विजेतेपदाच्या मार्गातील अडसर ठरण्याची शक्यता आहे, हे मत व्यक्त केले आहे जयपूर पिंक पँथर्स संघाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू जसवीर सिंगने.

जसवीरने २०१४ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याचप्रमाणे गतवर्षी भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात त्याचे महत्त्वाचे योगदान होते. नुकतीच त्याची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे. याबाबत व एकूणच कबड्डीच्या प्रगतीसंबंधी त्याच्याशी केलेली खास बातचीत-

  • प्रो कबड्डीच्या लिलावामध्ये यंदा परदेशी खेळाडूंना भरपूर बोली लाभली आहे. त्याबाबत काय मत आहे?

परदेशी खेळाडूंना या लीगमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. अबोझर मोहाजेरमिघानी ला या लीगमधील पदार्पणातच ५० लाख रुपयांचे मानधन मिळाले. या लीगमध्ये परदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मिळत आहे. हे खेळाडू भविष्यात आपल्याला त्रासदायक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरीही आपल्या खेळाडूंचे तंत्र खूपच वेगळे आहे. त्यांची जशी प्रगती होत आहे, तशी प्रगती आपल्याही खेळाडूंची होत आहे. अर्थात या खेळात मक्तेदारी टिकवण्यासाठी भारताला भविष्यात संघर्ष करावा लागणार आहे.

  • अर्जुन पुरस्काराबाबत काय सांगता येईल?

आजपर्यंत मी कधीच एखाद्या पुरस्काराचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत खेळलेलो नाही. कायमच संघनिष्ठेला प्राधान्य देत खेळलो आहे, तरीही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस होणे, ही गोष्टही माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. एरवी अ‍ॅथलेटिक्स, हॉकी, बॉक्सिंग आदी अन्य खेळांना या पुरस्कारासाठी प्राधान्य मिळते. या पाश्र्वभूमीवर माझ्या नावाची शिफारस म्हणजे कबड्डी खेळाचा गौरव आहे.

  • प्रतिस्पर्धी खेळाडूंकडे पाठ केल्यानंतर उलटी टांग मारण्याची तुझी खास शैली आहे. ही शैली कशी विकसित केली?

ते माझे गुपीत आहे. हरयाणामधील अनेक खेळाडूंनी अशी शैली विकसित केली आहे. फक्त एवढेच अशी टांग मारताना मी आत्मविश्वासाने खेळाडू टिपू शकतो. सर्वानाच त्यामध्ये यश मिळतेच असे नाही. अशी टांग टाकताना तुम्ही सहज पकडले जाऊ शकता. तसा धोका टाळण्यासाठी लवचीकता व वेगवान हालचाल करण्याची आवश्यकता असते.

  • संघांच्या वाढत्या संख्येमुळे प्रो कबड्डी लीग कालांतराने कंटाळवाणी व तोचतोचपणा ठरू शकते काय ?

संघांची संख्या वाढली आहे, ही खेळाच्या लोकप्रियतेचीच पावती आहे. ही लीग आता तीन महिने चालणार आहे. या लीगमधील सामन्यांमध्ये चुरस कायमच असल्यामुळे प्रेक्षक त्याला कंटाळतील असे मला वाटत नाही. कारण संघांच्या वाढत्या संख्येबरोबरच सामन्यांची ठिकाणेही वाढत आहेत. नवनवीन ठिकाणच्या लोकांना त्याचा आनंद घेता येत आहे. गतवर्षी या लीगसाठी खेळाडूंची निवड करताना अनेक खेळाडूंना वगळावे लागले होते. पहिल्या फळीतील खेळाडूंप्रमाणेच दुसऱ्या फळीतील खेळाडूंनाही यंदा संधी मिळाली आहे. युवा खेळाडूंनाही वरिष्ठ खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मिळू लागला आहे. त्याचा फायदा त्यांना भावी काळासाठी मिळू शकेल.

  • मातीपेक्षा मॅटवर दुखापतींचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्याविषयी काय सांगता येईल?

मॅटवरील कबड्डीत पाय मुरगळणे, गुडघ्याला दुखापत होणे आदी दुखापतींचे प्रमाण वाढले आहे, हे मान्य करावे लागले. मात्र हा खेळ अधिकाधिक देशांमध्ये पोहोचण्यासाठी कुठेतरी तडजोड करणे अपरिहार्य असते. आता प्रत्येक संघाबरोबर फिजिओ नियुक्त केलेला असतो. खेळाडूंच्या दुखापती कशा टाळता येतील, यादृष्टीने तो पूरक व्यायाम करून घेतो. तसेच दुखापत झाल्यास खेळाडूला त्यामधून लवकर कसा आराम मिळेल, याचाही तो विचार करीत असतो. या खेळामुळे खेळाडूंना पैसा व प्रसिद्धी मिळत आहे. आपली तंदुरुस्ती कशी टिकवता येईल, याकडे खेळाडूंनी प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.