|| प्रशांत केणी

आठवडय़ाची मुलाखत : कैलास पाटील, रायगडचे प्रशिक्षक

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील रायगडचे यश हे साखळीपासून अंतिम सामन्यापर्यंत खेळणाऱ्या बाराही खेळाडूंचे आहे. सुल्तान डांगे आणि मोबिन शेख हे अप्रतिम खेळले. याचप्रमाणे बिपिन थळे, मितेश पाटील, आमिर धुमाळ आणि संकेत बनकर यांचे योगदानसुद्धा महत्त्वाचे होते. सांघिक कामगिरी हीच रायगड संघाच्या यशाची गुरुकिल्ली आहे, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक कैलास पाटील यांनी व्यक्त केली. याआधी १७ वर्षांपूर्वी रायगड संघाने राज्य अजिंक्यपदावर नाव कोरले होते. त्या वेळी पाटील हे संघाचे कर्णधार होते. त्यानंतर काही वर्षांपूर्वी पाटील यांनी रायगडला कुमारांचे उपविजेतेपद जिंकून दिले होते. सिन्नरला नुकत्याच झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील रायगडच्या कामगिरीविषयी पाटील यांच्याशी केलेली खास बातचीत –

  • रायगडच्या विजेतेपदाचे रहस्य काय सांगाल?

आस्वाद पाटील आणि रायगड जिल्हा कबड्डी संघटनेने माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो मी सार्थ ठरवला. राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगडच्या संघनिवडीमध्ये माझी भूमिकासुद्धा महत्त्वाची होती. १०० टक्के मनासारखा संघ मिळाल्यामुळे त्यानुसार स्पर्धेची योग्य तयारी करता आली.

  • सांगलीविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी कोणती रणनीती आखली होती?

सांगलीचा संघ मैदानी डावपेचांमध्ये तरबेज आहे, याची मला पूर्णत: जाणीव होती. नितीन मदनेसाठी आम्ही आखलेली रणनीती यशस्वी ठरली. मध्यंतरानंतर रायगडचा संघ पाच, चार, तीन खेळाडूंसहच खेळला. बोनस गुण मिळवण्यात सांगलीचे खेळाडू पटाईत आहेत. मात्र आमचे सहापेक्षा कमी खेळाडू मैदानावर राहिल्याने त्यांना बोनस गुण घेताच आले नाहीत. दुसऱ्या सत्रात मितेशने केलेल्या पकडी या सामन्याला कलाटणी देणाऱ्या ठरल्या.

  • राज्य अजिंक्यपदाच्या दृष्टीने तुम्ही संघाची तयारी कशा रीतीने करून घेतली?

बरेचसे प्रशिक्षक हे खेळाडूंकडून दोन-अडीच तास कसून सराव करून घेतात. मात्र मीसुद्धा एक खेळाडू असल्यामुळे ही पद्धती स्वीकारली नाही. दररोज सकाळी अर्धा तास तंदुरुस्ती आणि संध्याकाळी एक तास सांघिक कौशल्याचा सराव हे साधे सूत्र आखले. खेळाडूंना अनुकूल असा सराव मिळाल्यामुळे ते ताजेतवाने राहिले. कोणत्याही खेळाडूला दुखापत होणार नाही, ही काळजी प्रामुख्याने सरावात घेतली. धसमुसळा खेळ सिन्नरलाच दाखवा, सरावात नको, हे खेळाडूंना बजावले होते.

  • राज्यात सर्वाधिक स्पर्धा रायगडला होतात, मात्र स्पर्धेइतकी गुणवत्ता दिसून येत नाही, याचे काय कारण आहे?

रायगडमध्ये मोठय़ा प्रमाणात स्पर्धा होतात. या स्पर्धा बहुतांशी रविवारी किंवा एक-दोन दिवसांच्या असतात. बऱ्याचदा आठवडय़ातून तीन स्पर्धा खेळाव्या लागतात. त्यामुळे खेळाडूंच्या दुखापतींचे प्रमाण जास्त असते. अधिक स्पर्धामुळे योग्य तंदुरुस्ती जोपासणे खेळाडूंना कठीण जाते. त्यामुळेच स्पर्धेइतकी गुणवत्ता दिसून येत नाही.

  • रायगडला जेतेपद तर मिळाले, आता ते टिकवण्यासाठी काय प्रयत्न असेल?

वर्षभर सर्व स्पर्धा खेळण्यापेक्षा महत्त्वाच्या स्पर्धाच खेळा. याचप्रमाणे दुखापती होणार नाहीत आणि झालेल्या दुखापती आणखी गंभीर होणार नाहीत, याची काळजी घ्या.