प्रो कबड्डी लीगच्या व्यासपीठावर मनजित चिल्लरला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानले जाते. अभेद्य बचावाची क्षमता असलेल्या मनजितला दुसऱ्या हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. मनजितच्या नेतृत्वाखाली बंगळुरू बुल्सने पहिल्या दोन हंगामांमध्ये अव्वल तीन संघांमध्ये स्थान प्राप्त केले होते. आता तिसऱ्या हंगामात तो पुणेरी पलटणच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे. पुण्याच्या संघाला नवसंजीवनी देण्याचे आव्हान मनजितसमोर असणार आहे. एअर इंडियाकडून खेळलो, तेव्हा पुण्याचे प्रशिक्षक अशोक शिंदे यांचे मार्गदर्शन मला मिळाले आहे. याशिवाय प्रो कबड्डी असो किंवा अन्य कोणतीही स्पर्धा या सर्व खेळाडूंसोबत किंवा प्रतिस्पर्धी म्हणून नेहमी खेळणे हे चालूच असते. शेवटी कबड्डी हे एक कुटुंब आहे. त्यामुळे फक्त जर्सी बदलली इतकेच. आधी बंगळुरू बुल्सची होती, आता पुणेरी पलटणची आहे, असे मनजितने संघबदलानंतरच्या मानसिकतेविषयी सांगितले. प्रो कबड्डीच्या तिसऱ्या हंगामाबाबत मनजितशी केलेली खास बातचीत-
’ कबड्डीची तू का निवड केलीस?
हरयाणात कुस्ती, बॉक्सिंग आणि कबड्डी हे तीन खेळ सर्वात जास्त खेळले जातात. मी आधी कुस्ती खेळायचो, पण एकदा खेळताना माझ्या नाकाला जबरदस्त दुखापत झाली आणि मी खेळ सोडला. त्यानंतर काही काळाने कबड्डी खेळायला प्रारंभ केला आणि हा खेळ अतिशय आवडू लागला. कुस्ती हा ताकदीचा म्हणजेच सामर्थ्यांचा खेळ आहे. त्यामुळे कबड्डी खेळताना त्याचा खूप फायदा झाला आणि मी वेगाने प्रगती करू शकलो.
’ तुझे वडील जयप्रकाश चिल्लर आधी सेनादलात होते, मग हरयाणा पोलीसमध्ये नोकरी करायचे. ते तुझ्या खेळाकडे कसे पाहायचे?
माझे वडीलसुद्धा कबड्डी खेळायचे. त्यामुळे कुस्ती, कबड्डीपटू घडवण्यासाठी कोणता आहार मुलाला द्यायला हवा, याबाबत ते गंभीर असायचे. त्यांच्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाने मला सदैव पाठबळ दिले.
’ प्रो कबड्डी आल्यानंतर आता निझामपूर या तुझ्या गावी वातावरण कसे आहे?
माझ्या गावात आधीसुद्धा कबड्डी हा खेळ लोकप्रिय होता आणि आतासुद्धा त्यात वाढच झाली आहे. अनेक ठिकाणी छोटी-छोटी मुले कबड्डी खेळताना दिसतात. अनुप कुमार, अजय ठाकूर, दीपक हुडा यांच्यासारखा खेळाडू होण्याच्या ईष्रेने ते खेळतात. गावात कबड्डीसाठी स्टेडियमसुद्धा बांधण्यात आले आहे. याशिवाय कबड्डीच्या मैदानांची संख्याही वाढली आहे. मी जेव्हा गावी जातो, तेव्हा या घडणाऱ्या मुलांसोबत बराच वेळ घालवतो.
’ जसा क्रिकेट हा फलंदाजाचा खेळ मानला जातो, तसा कबड्डी हा चढाईपटूंचा खेळ मानला जायचा; परंतु प्रो कबड्डी आल्यापासून बचावपटूलाही वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. याबाबत काय सांगशील?
चढाई हे एका खेळाडूचे कर्तृत्व असते. मात्र पकड ही सांघिक गोष्ट आहे. तिथे एका खेळाडूच्या प्राथमिक प्रयत्नांना बाकीच्यांचे सहकार्य मिळते, तेव्हाच ते यशस्वी होतात. आपले घर मजबूत असणे, हे अधिक महत्त्वाचे असते. प्रो कबड्डीतील ‘सुपर टॅकल’सारख्या नियमांमुळे बचावपटूंचेही महत्त्व वाढले आहे, हे मात्र नाकारता येणार नाही. आक्रमक आणि बचावपटू यांना मी तरी समान महत्त्व देतो.
’ भविष्यात कबड्डी खेळासाठी काय करायची तुझी इच्छा आहे?
माझ्या गावाप्रमाणे देशभरात कबड्डीपटू घडवण्याचे कार्य मी निरंतर चालू ठेवेन. प्रो कबड्डीसारख्या स्पध्रेत प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळायला मला अतिशय आवडेल.
’ पहिल्या दोन हंगामांमध्ये पुणे पलटण संघाची कामगिरी अतिशय खराब झाली होती. यंदाच्या हंगामात कशी कामगिरी होईल?
यंदाच्या हंगामात आम्ही नव्याने रणनीती तयार केली आहे. उपान्त्य फेरी गाठण्याचे आमचे सर्वात पहिले लक्ष्य असेल. आठ संघांपैकी चार सर्वोत्तम संघ अर्थातच बाद फेरीत पोहोचतील. पुण्याचा संघ आतापर्यंतचे अपयश मागे टाकून यंदा चांगली कामगिरी करून दाखवेल, यावर माझा विश्वास आहे.