|| धनंजय रिसोडकर

आठवडय़ाची मुलाखत – मीराबाई चानू, अव्वल वेटलिफ्टर

लाकडाच्या मोळ्यांपासून सुरू झालेला हा संघर्षमय प्रवास आता २०० किलो वजन उचलण्यापर्यंत येऊन पोहोचला असून, नजीकच्या भविष्यात २१० किलोचे लक्ष्य मी ठेवले आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील पदक, हेच आता पुढील लक्ष्य असल्याचे देशातील सर्वोच्च प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराने सन्मानित अव्वल वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने सांगितले.

‘‘माझे घर हे डोंगरदऱ्यांच्या सान्निध्यात गेले. घरी अन्न शिजवण्यासाठी लाकूडफाटा गोळा करून आणायला लागायचा. तो आणण्यासाठी मला डोंगरात, रानावनात जावे लागायचे. मग छोटय़ा-छोटय़ा मोळ्यांच्या चार चकरा मारण्याऐवजी मी अधिकाधिक मोठी महिनाभराची मोळी बांधून एकदाच खाली यायचे. खरे तर तिथूनच माझ्या वजन उचलण्याच्या सरावाला प्रारंभ झाला, असे म्हणता येईल,’’ अशा शब्दांत मीराबाईने आपल्या आयुष्याचा पट उलगडला. ईशान्य भारतातील मणिपूरच्या इम्फाळनजीकच्या खेडय़ातील सामान्य घरातून पुढे आलेल्या मीराबाईशी मुंबईमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेली खास बातचीत

  • तुझी कमी उंची किंवा क्षमतांबाबत उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नांना तू कशी सामोरी गेलीस?

माझी उंची खरोखरच कमी असल्याने प्रारंभीच्या काळात मला अनेकांनी हा खेळ तुला झेपणार नाही, तुला जमणार नाही असे सल्ले दिले. मात्र त्या सगळ्याकडे मी नेहमी आव्हान म्हणून पाहिले. त्या गोष्टीचा न्यूनगंड येऊ न देता माझी कमी उंची हे शरीर संतुलनासाठी सर्वोत्तम असल्याचे लक्षात ठेवले. तसेच आपल्या ध्येयापासून नजर अजिबात हलू दिली नाही.

  • ऑलिम्पिकमधील कामगिरीतील घसरण आणि आशियाई क्रीडा स्पध्रेतही तंदुरुस्तीअभावी जाऊ न शकल्याचा कारकीर्दीवर परिणाम होईल, अशी भीती वाटली का?

रिओ ऑलिम्पिकला मला प्रवेश मिळाल्याने मी जरा जास्तच उत्साहित झाले. त्यामुळे मी माझी नेहमीइतकी कामगिरीदेखील करू शकले नाही, तर पाठीचे दुखणे बळावल्याने आशियाई स्पध्रेतदेखील सहभागी होऊ शकले नाही. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून मला इतके वाईट वाटले की मी खेळ सोडून द्यायचा विचार करू लागले होते. पण माझ्या आईनेच माझी समजूत घालून पुन्हा खेळाकडे वळवले. त्यादरम्यान मी विश्व अजिंक्यपद जिंकले. याचे सारे श्रेयदेखील मी आईलाच देते.

  • आता तंदुरुस्त आहेस की अजून काही समस्या आहेत आणि खेळाडूला दुखापतीतून सावरणे किती अवघड जाते?

हो, दुखापतीमधून बाहेर पडण्याचा काळ खूपच बिकट असतो. त्यात शारिरीक आणि मानसिक असे दोन्ही आघाडय़ांवर लढावे लागते. माझी पाठीची समस्या आता बरी असून मी नुकतीच आठवडाभरापासून सरावाला पुन्हा प्रारंभ केला आहे. पण अजून महिनाभरात स्पर्धेत खेळण्याइतकी पूर्ण सक्षम नसल्याने नोव्हेंबरमध्ये होणारी जागतिक अजिक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत उतरणार नाही. मात्र त्यानंतर २०१९ मध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरून आलिम्पिकची पात्रता गाठेन.

  • देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळाल्याने काय वाटते आणि आता आणि पुढील लक्ष्य काय?

माझ्या देशाने माझा इतका मोठा सन्मान केला, हे अजूनही मला खरे वाटत नाही. एक स्वप्न असल्यासारखे भासते. मला अगदी शब्दातीत आनंद झाला. यापुढील काळात मी टोकियो ऑलिम्पिक हेच लक्ष्य ठेवले असून तिथे पदक मिळवण्याचा मी निर्धार केला आहे. रिओ ऑलिम्पिकवेळी मी १९२ किलो वजन उचलायचे. त्या वेळी १९२ किलो उचलणाऱ्याला रौप्यपदक मिळाले होते. आता तर मी २०० किलोपर्यंतचे वजन उचलते. अजून दोन महिन्यांमध्ये मी २१० किलो उचलण्याचे लक्ष्य निर्धारित केले असून ते शक्य केल्यास मला फारसे आव्हान उरणार नाही.