News Flash

दुखापतीनंतर पुनरागमन आव्हानात्मक

आठवडय़ाची मुलाखत : निक्कीन थिमैयाह, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू

आठवडय़ाची मुलाखत : निक्कीन थिमैयाह, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू

खेळाडूला कारकीर्दीत अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. या प्रवासात प्रत्येक वेळी यश मिळेलच याची खात्री नसते, परंतु नव्या जोमाने आव्हानांचा सामना करण्याची जिद्द खेळाडूमध्ये असते. मात्र दुखापतीमुळे अनेक दिग्गज खेळाडूंचे खच्चीकरण होते. मैदानावरील आव्हानांपेक्षा दुखापतीतून स्वत:ला सावरणे आणि पुनरागमन करणे, यात खेळाडूची खरी कसोटी लागते, असे मत दबंग मुंबई संघातील खेळाडू निक्कीन थिमैयाहने व्यक्त केले.

हॉकी इंडिया लीगमध्ये दबंग मुंबई संघाचा अश्वमेध रोखण्यात प्रतिस्पर्धी संघाला अपयश येत आहे. पण लीगच्या पहिल्याच सामन्यात घरच्या मैदानावर पराभवापासून मुंबईला निक्कीनने वाचवले. सामन्याच्या अगदी शेवटच्या मिनिटाला चपळाईने गोल करून निक्कीनने मुंबईला विजय मिळवून दिला. त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये मुंबईने एकामागून एक यशाचे इमले रचले. गेल्या मोसमात दुखापतीमुळे लीगमध्ये खेळता न आलेल्या निक्कीनने दमदार पुनरागमन करताना मुंबईच्या विजयी घोडदौडीत महत्त्वाचा वाटा उचलला आहे. आता मुंबईला जेतेपद मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या निक्कीनशी केलेली खास बातचीत-

  • गेल्या मोसमात तुला दुखापतीमुळे खेळता आले नाही. पण यंदा दबंग मुंबईकडून खेळताना तू जेतेपदाच्या समीप आला आहेस. काय सांगशील या वाटचालीबाबत?

दबंग मुंबईची ही वाटचाल स्वप्नवतच म्हणावी लागेल. गेल्या मोसमात दुखापतीमुळे मला हॉकी लीगमध्ये खेळता आले नाही. मात्र यावेळी मुंबईकडून खेळताना १०० टक्के योगदान देण्याचा मी निर्धार केला आणि त्यात आत्तापर्यंतच्या प्रवासात यश मिळवले. आम्ही उपांत्य फेरीत प्रवेश निश्वित केला असून जेतेपदाचा चषक आम्हाला खुणावत आहे.

  • भारतीय पुरुष हॉकी संघासाठी २०१६ हे वर्ष भरभराटीचे होते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अशी कोणती प्रेरणा संघाला मिळाली?

२०१६ हे वर्ष हे भारतीय हॉकीसाठी ऐतिहासिक वर्ष असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यात हॉकी लीगचाही महत्त्वाचा वाटा आहे. या लीगने भारतीय हॉकीत उल्लेखनीय बदल घडवले. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची संधी या लीगने दिली. पण भारतीय संघाच्या यशस्वी प्रवासात रोलँट ओल्टमन्स यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्यामुळेच संघ एकेक शिखर पादाक्रांत करत गेला.

  • चॅम्पियन्स चषक असो किंवा सुलतान अझलन शाह चषक स्पर्धा असो. तुझे योगदानही उल्लेखनीय होते. पण दुखापतीमुळे तुझ्या खेळावर मर्यादा आल्या. असे तुला वाटते का?

संघातील प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्त्वाचे असते. त्यामुळे मी एकटय़ाने काही वेगळे केले नाही. सहकाऱ्यांशिवाय ते शक्यही झाले नसते. दुखापतीविषयी बोलायचे तर त्यातून सावरल्यानंतर पुनरागमन करताना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. त्याला मी आव्हान समजतो. २०१५ला माझ्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्यावर शस्त्रक्रिया झाली. पण मी खचून न जाता नव्या जोमाने सराव केला आणि त्याचा फायदा झाला.

  • ओल्टमन्स, टेरी वॉल्श आणि पॉल व्हॅन अ‍ॅस या तिन्ही प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी तुला मिळाली. त्याने तुझ्या खेळात सुधारणा होण्यास मदत झाली का?

हे तिघेही सर्वोत्तम प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. २०१३च्या आशिया चषक स्पध्रेतून मी राष्ट्रीय संघात पदार्पण केले. त्यावेळी ओल्टमन्स हे उच्च कामगिरी संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. खेळाडूंसोबत ते सतत संवाद साधतात आणि खेळाडूंना त्यांची चूकही सहजतेने समजावून सांगतात. टेरी वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली मी खऱ्या अर्थाने घडलो.

 

  • तू ४०० मीटर शर्यतीत राष्ट्रीय स्पध्रेत रौप्यपदक जिंकले आहेस, पण मग हॉकीकडे तू कसा वळलास ?

खेळामध्ये कारकीर्द घडवणे, हे माझे स्वप्न होते. मी फुटबॉल आणि अ‍ॅथलेटिक्समध्येही भाग घ्यायचो. पाचव्या वर्षांपासून हॉकी खेळायला सुरुवात केली. माझे वडील हॉकीपटू होते आणि अनेक दौऱ्यांवर त्यांच्यासोबत जाण्याची संधी मिळायची. त्यावेळी अनेक वरिष्ठ खेळाडूंसोबत संवाद साधायला मिळाला आणि हॉकीमधील रुची वाढली. आई-वडिलांनीही मला पाठिंबा दिला. खेळात कारकीर्द घडवण्यासाठी बंगळुरू येथील सेंट जोसेफ इंडियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. जवळपास सर्वच खेळांमध्ये माझी कामगिरी चांगली होत होती आणि त्यामुळे मी अ‍ॅथलेक्टिसमध्ये सहभाग घेतला. १६ वर्षांखालील राष्ट्रीय स्पध्रेत ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदकही जिंकले आहे, परंतु ज्यावेळी आयुष्यात मला एका खेळाची निवड करावी लागली, तेव्हा मी हॉकीला निवडले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 2:35 am

Web Title: loksatta sport interview with nikkin thimmaiah
Next Stories
1 भारतीय महिला अंतिम फेरीत
2 IPL 2017 : रायजिंग पुणे सुपरजायन्टसच्या कर्णधारपदावरुन धोनी पायउतार
3 संदीपचा पुन्हा राष्ट्रीय विक्रम
Just Now!
X